लक्षवेधी : चीन, माहितीयुद्ध आणि भारत

-ब्रिगे. हेमंत महाजन (निवृत्त)

भारत-चीनमधील लष्करी स्तरावर होणारी ही बैठक चुशूलमध्ये झाली. पण शेवटची बातमी हाती येईपर्यंत या बैठकीत नेमके काय झाले हे समोर आले नव्हते. सध्या भारतात चाललेले प्रपोगंडा/माहितीयुद्ध चीनच्या आत चिनी सरकार आणि सैन्याच्या विरुद्ध नेण्याची गरज आहे. लडाखमध्ये चाललेल्या मिलिटरी स्टॅन्ड ऑफ नंतर दुष्प्रचार युद्धाला वेग आलेला आहे.

भारताच्या प्रिंट, इलेक्‍ट्रॉनिक आणि सोशल मीडियामध्ये अनेक चिनी हस्तक वेगवेगळ्या प्रकारचा दुष्प्रचार देशाच्या राष्ट्रहिताच्या विरुद्ध करत आहे. असे दाखवण्यात येते की, आपण आपल्या सीमेचे रक्षण करण्याकरता समर्थ नाही आणि चीन आपल्यावरती नेहमीच कुरघोडी करत आहे. काही विकले गेलेले चिनी हस्तक आणि काही तथाकथित तज्ज्ञ हे दुष्प्रचार युद्ध चीनच्या बाजूने करून चीनला मदत करत आहेत. ते असे का करतात? याचे कारण त्यांना मिळणारा पैसा किंवा आपल्या देशाविषयी असलेला राग किंवा इतरही काही कारणे असू शकतील.

प्रपोगंडा चीनमध्ये केला जात नाही परंतु असा प्रपोगंडा चीनमध्ये केला जातो का? त्याचे थोडक्‍यात उत्तर आहे, अजिबात नाही. कारण चिनी मीडियावरती चीनचे पूर्ण नियंत्रण असल्यामुळे तिथे कोणालाही प्रवेश नाही. चिनी भाषेत वर्तमानपत्रे काय लिहितात हे सुद्धा आपल्याला कळत नाही. मात्र, त्यांचे इंग्लिश भाषेतील वर्तमानपत्र ग्लोबल टाइम्स आपण इंटरनेटवरती वाचू शकतो. त्यामध्ये चीन सरकारच्या विरुद्ध एक शब्दसुद्धा लिहिला जाऊ शकत नाही. जर कोणी लिहिला तर लगेच त्या माहितीला तिथून काढून टाकले जाते. म्हणजे चिनी जनता कुठल्याही दुष्प्रचार किंवा अपप्रचारापासून पूर्णपणे सुरक्षित आहे. माहिती युद्धापासून अज्ञानी आहे आणि त्यांना त्यांचे सरकार जे सांगेल तेवढेच फक्‍त कळते.

गलवानमध्ये प्राणाचे बलिदान दिलेल्या भारतीय सैनिकांचा अंत्यसंस्काराचे व्हिडिओज इलेक्‍ट्रॉनिक मीडियामध्ये व्हायरल झाले आणि कृतज्ञ देशाने त्यांना श्रद्धांजली वाहिली. मात्र चीनमध्ये 50 हून मारल्या गेलेल्या सैनिकांची नावेसुद्धा प्रकाशित करण्यात आली नाही. त्यांच्यावर चुपचाप अंत्यसंस्कार करण्यात आले. यामुळे चीनमध्ये राग पसरला आहे. वेस्ट थिएटर कमांडचे प्रमुख असलेले जनरल झाओ झोंगकी यांनी या हल्ल्याचे नियोजन केले होते. त्यांना चीनने बडतर्फ केले. चीनची सोशल मीडिया वैबो वरती नागरिक आपला राग दाखवत आहे.

भारतात/परदेशामध्ये वसलेल्या चिनी नागरिकांविरुद्ध माहितीयुद्ध

चीन विरुद्ध आपण प्रपोगंडा/माहितीयुद्ध कसे करायचे? त्यांच्या मीडियामध्ये घुसखोरी कशी करायची? चीन कुठल्याही माहिती युद्धापासून सुरक्षित आहे. आज सात ते आठ कोटी चिनी नागरिक परदेशामध्ये वसलेले आहेत. याशिवाय लाखो चिनी विद्यार्थी शिकण्याकरता परदेशात जातात. गेल्या वर्षी कोट्यवधी चिनी नागरिक पर्यटन करण्याकरता परदेशात फिरले आहेत. चीनच्या बाहेर असलेली ही चिनी लोकसंख्या आपल्या प्रपोगंडाचे लक्ष असायला पाहिजे. नंतर ही माहिती ते आपल्याबरोबर चीनला घेऊन जातील यामुळे या माहितीचा चीनमध्ये प्रसार होईल. नेमके हे कोणी आणि कसे करायचे. इन्फॉर्मेशन ब्रॉडकास्टिंग मिनिस्ट्री आणि परराष्ट्र मंत्रालयाच्या नेतृत्वाखाली हे केले जावे. त्याकरता लागणारी माहिती त्या-त्या देशातील भारतीय दूतावासाकडून गोळा केली जावी. आपल्या सगळ्या लिखाणामध्ये आणि व्हिडीओजमध्ये (थिम असावी) हे सांगितले जाईल की, चिनी नागरिकांचा सर्वात मोठा शत्रू हा चिनी सरकार आणि चिनी सैन्य आहे.

चिनी सैन्य परदेशाच्या विरुद्ध वापरले जात नाही परंतु त्यांचा सर्वात जास्त उपयोग चीनमधल्या शिनझियांग, तिबेट आणि इतर अल्पसंख्याक असलेल्या प्रांतांमध्ये केला जातो. चिनी नागरिकांना आठवत असेल की चिनी लष्कराने शांततेने आंदोलन करणाऱ्या चिनी नागरिकांवरती रणगाडे आणि मोठी शस्त्र घेऊन हल्ला केला होता, ज्यामध्ये हजारो चिनी नागरिक मारले गेले होते.

सर्व राष्ट्रांशी एकजूट करायला पाहिजे

अशा प्रकारच्या माहिती युद्धामध्ये आपण अशा सगळ्या राष्ट्रांशी एकजूट करायला पाहिजे जे चिनी प्रपोगंडाचे लक्ष्य बनलेले आहेत. उदाहरणार्थ, आशियामधील देश, युरोप, ऑस्ट्रेलिया, अमेरिका आणि इतर अनेक. आपण सगळे एकत्र आलो तर आपल्याला एका मोठ्या प्रमाणामध्ये माहितीयुद्ध चीनच्या विरुद्ध सुरू करता येईल. ज्यामुळे सत्य परिस्थिती ही चिनी नागरिकांना कळेल.

आज चीनची अर्थव्यवस्था अडचणीत आल्यामुळे तिथे बेकारी वाढली आहे नोकऱ्या कमी झाल्या आहेत आणि नागरिकांना अनेक आर्थिक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे यामुळे नागरिक रागावलेले आहेत. याशिवाय “वन चाइल्ड पॉलिसी’मुळे चिनी समाजामध्ये चिनी मुलांना लग्नाकरता मुली मिळत नाही. यामुळे अनेक वेळा मुलींचे इतर देशातून स्मगलिंग केले जाते. याशिवाय चिनी सरकार आपल्या आजारी नागरिकांचे ऑर्गन हार्वेस्टिंग करण्याकरता सुद्धा मागे पाहात नाही. अशा घटना कुठल्याही सुसंस्कृत राष्ट्रांमध्ये होत नाही, मात्र चीनमध्ये होतात.

अर्थातच याकरता माहितीयुद्ध पुष्कळ वेळ लढावे लागेल. या युद्धाचा मुख्य उद्देश असावा की, सध्याची असलेली चिनी राजवट चिनी लोकांनी उलथवून टाकली पाहिजे. असे झाले तर चीनची आक्रमकता कमी करण्यामध्ये आपल्याला यश मिळेल.

Leave A Reply

Your email address will not be published.