पिंपरी, दि. 18 – फॉरेक्स ट्रेडिंग केल्यास भरपूर फायदा होतो, असे सांगत अनोळखी व्यक्तींनी एका वृद्ध व्यक्तीला गुंतवणूक करण्यास भाग पाडले. वृद्ध व्यक्तीस फायदा होत असल्याचा खोटा इलेक्ट्रॉनिक अभिलेख तयार केला. यामध्ये आरोपींनी वृद्धाची 26 लाख 91 हजार रुपयांची ऑनलाइन आर्थिक फसवणूक केली. हा प्रकार एप्रिल 2022 ते 17 नोव्हेंबर 2022 या कालावधीत रहाटणी येथे घडला.
विश्वनाथ मोहन गोसावी (वय 72, रा. रहाटणी) यांनी याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार 7047325915, 8710046005, 7430972280, 7047326015, 8710041508, 8670266423 मोबाइल क्रमांक धारक आणि अन्य लोकांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपींनी फिर्यादींना फोनवरून संपर्क केला. ऑटो एफएक्स ट्रेड कंपनीचे प्रतिनिधी असल्याचे खोटे सांगून ऑनलाइन ट्रेड केल्यास जास्त फायदा होतो असे सांगितले. नकली वेबसाइट तयार करून त्यावर विश्वनाथ गोसावी यांच्या मुलाला अकाऊंट तयार करण्यास लावले. ए यु स्मॉल फायनान्स बॅंक खात्यावर वेगवेगळ्या कारणांसाठी 16 लाख 91 हजार रुपये गुंतवण्यास भाग पाडले. फॉरेक्स ट्रेडिंगच्या आयडीवर विश्वनाथ गोसावी यांना पाच लाख 32 हजार 547.80 यु एस डॉलर (चार कोटी भारतीय रुपये) एवढा फायदा झाल्याचे आरोपींनी दाखवले. त्यानंतर आणखी दहा लाख रुपये रोख देण्यास भाग पाडून विश्वनाथ गोसावी यांची 26 लाख 91 हजार रुपयांची फसवणूक केली.