वाघोली (प्रतिनिधी) : वाघोली तालुका हवेली येथील गट नंबर अकराशे तेवीस(1123) मधील दोन हेक्टर जागा जिल्हा न्यायालयासाठी देण्यास ग्रामस्थांनी विरोध दर्शवला असून याबाबतचे निवेदन प्रशासनाला दिले आहे.
वाघोली तालुका हवेली येथील मंडलाधिकारी व भूकरमापक हवेली व सहाय्यक अधीक्षक जिल्हा न्यायालय पुणे यांच्या उपस्थितीत गट नंबर अकराशे तेवीस मधील दोन हेक्टर जागा न्यायालया करता उपलब्ध करून देण्याबाबत जिल्हा न्यायालयाने पुणे जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी केली होती त्यानुसार जागा मोजून जागेचा ताबा घेण्याकरता आलेल्या अधिकाऱ्यांना वाघोली मधील ग्रामस्थांनी विरोध दर्शवत इतर शासकीय जागेतील जागा जिल्हा न्यायालया करता देण्यात यावी अशी मागणी केली आहे.
वाघोली तालुका हवेली येथील बाजार तळाच्या जागेत ४० ते पन्नास वर्षापासून भाजीपाला विक्रीचा व्यवसाय शेतकऱ्यांकडून केला जात आहे. वाघोलीच्या बाजार तळ्याच्या जागेत सर्व सांस्कृतिक, राजकीय, विविध क्रीडा कार्यक्रम अनेक वर्षांपासून पार पडत असल्याने जिल्हा न्यायालयाने मागणी केलेली दोन हेक्टर जागा वाघोली मधील इतर शासकीय जागेतून जिल्हाधिकाऱ्यांच्या मान्यतेने घ्यावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
“वाघोली मधील बाजाराची जागा भाजी मंडई साठीच कायमस्वरूपी असावी व जिल्हा न्यायालयाने मागणी केलेली न्यायालयासाठी ची जागा वाघोली मधील इतर शासकीय गटातून जिल्हाधिकाऱ्यांनी द्यावी अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे. बाजार तळाची जागा जिल्हा न्यायालयासाठी देण्यासाठी ग्रामस्थांचा विरोध कायम राहणार आहे”.
– रामभाऊ दाभाडे (माजी जिल्हा परिषद सदस्य)
वाघोली बाजाराची जागा आहे भाजी मंडई साठीच ठेवावी अशी मागणी माजी जिल्हा परिषद सदस्य रामभाऊ दाभाडे, माजी सरपंच शिवदास उबाळे, किसन जाधवराव, विठ्ठल शिवरकर, संजय सातव पाटील, किशोर सातव पाटील, अतुल शिंदे, माजी उपसरपंच महेंद्र भाडळे, सागर जाधव, दीपक काळे,भारत सातव आदींनी केली आहे.