- बाधितांपेक्षा करोनामुक्तांची संख्या अधिक
- करोनाचा आलेख स्थिर
पिंपरी – पिंपरी चिंचवड शहरातील करोनाबाधित रुग्णांचा आलेख गेल्या तीन दिवसांपासून स्थिरावला आहे. तीन दिवसांपासून दोन हजारच्या पटीत नवीन रुग्णांची भर पडत आहे. आज दिवसभरात बाधित रुग्णांपेक्षा जास्त रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. आज 2054 नवीन बाधितांची नोंद करण्यात आली. तर 2471 रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. तसेच 24 तासांत 65 करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.
पालिकेने प्रसिद्ध केलेल्या पत्रकानुसार, रविवारी (दि. 9) शहरात 2020 जणांना करोनाची लागण झाली. तर शहराबाहेरील 34 बाधितांना शहरातील विविध कोविड रुग्णालयांत दाखल करण्यात आले आहे. आजपर्यंत शहरातील 2 लाख 30 हजार 223 जणांना करोनाची लागण झाली आहे. आज दिवसभरात 65 करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली. त्यामध्ये शहरातील 49 व शहराबाहेरील 24 जणांचा समावेश आहे. शहरातील चिंचवड, सांगवी, पिंपरी, निगडी, भोसरी, चिखली, कासारवाडी, तळवडे, पिंपळे सौदागर यासह शहरातील विविध भागांतील 49 रुग्णांचा मृत्यू झाला. तर शहराबाहेरील अहमदनगर, राजगुरुनगर, वडगाव, शिरुर, सनसवाडी, चाकण, नांदेड, कामशेत, बालेवाडी, तळेगाव येथील 24 जणांचा मृत्यू झाला.
आज दिवसभरामध्ये 2471 रुग्ण बरे झाल्याची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे बरे झालेल्या रुग्णांची संख्या 2 लाख 5 हजार 23 इतकी झाली आहे. तर दिवसभरात 10486 संशयित रुग्णांना महापालिकेच्या रुग्णालयामध्ये तपासणीसाठी दाखल केले आहे. सद्यःस्थितीत शहरातील महापालिकेची रुग्णालये व कोविड केअर सेंटरमध्ये 6954 रुग्ण उपचार घेत आहेत. तर गृह विलगीकरणात असलेल्या रुग्णांची संख्या 14907 इतकी आहे. दोन्ही मिळून उपचाराधीन असलेल्या रुग्णांची संख्या 21,861 इतकी आहे.
जिल्हा रुग्णालयात 11 करोनाबाधित ; तिघांचा मृत्यू
सांगवी येथील जिल्हा रुग्णालयात रविवारी (दि. 9) 11 करोनाबाधित रुग्ण आढळले. तर, तिघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. करोनाबाधित रुग्ण हे केडगाव, बालेवाडी, वाकड, हडपसर, भुकुम (ता. मुळशी), पिंपळे गुरव, पानशेत, निमगाव म्हाळुंगी येथील रहिवाशी आहेत. पिंपळे गुरव, पाषाण येथील 3 ज्येष्ठ नागरिकांचा करोनाने मृत्यू झाला. रुग्णालयातून रविवारी 5 रुग्ण बरे होऊन घरी परतले. कात्रज, दापोडी, शिवाजीनगर, लोणंद, येरवडा येथील हे रुग्ण आहेत. त्यामध्ये 2 पुरुष आणि 3 महिला रुग्णांचा समावेश आहे. पुणे ग्रामीण परिसरातील एका करोना संशयित रुग्णाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयामध्ये सध्या 74 जणांवर उपचार सुरू आहे. त्यातील 61 जणांची प्रकृती चिंताजनक आहे. रुग्णालयातून आत्तापर्यंत 1 हजार 229 जण बरे होऊन घरी परतले आहेत. 1 हजार 933 रुग्णांना होम क्वॉरंटाइन केले आहे. 303 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर, 342 रुग्णांना अन्य रुग्णालयात उपचारासाठी हलविले आहे.
मावळात दिवसभरात 162 जणांना करोनाची बाधा
मावळ तालुक्यात रविवारी (दि. 9) 162 रुग्णांचा करोना चाचणी अहवाल “पॉझिटिव्ह’ आला. तर तालुक्यात दिवसभरात 109 जणांना “डिस्चार्ज’ देण्यात आला. आज शहरी भागात रुग्ण संख्येत वाढ झाली आहे. सद्यस्थितीत उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 1 हजार 806 आहे.शहरी भागात 97, तर ग्रामीण भागात 65 रुग्ण आढळले. आज तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या हद्दीत 43 रुग्ण पॉझिटिव्ह आढळले. लोणावळा नगरपरिषदेच्या हद्दीत 34 व्यक्तींना बाधा झाली. वडगाव नगरपंचायतीच्या हद्दीत 20 रुग्ण आढळले. तालुक्यातील करोनाबाधितांची आतापर्यंतची एकूण संख्या 15 हजार 505 झाली आहे. तर दिवसभरात 109 रुग्ण बरे झाल्याने घरी सोडण्यात आले.