Corona : तिसऱ्या लाटेत फॅमिली डॉक्‍टर्सवर येणार भार; ‘टास्क फोर्स’कडून खास मार्गदर्शन

 

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतील एका वैशिष्ट्‌यपूर्ण व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे आज राज्य टास्क फोर्समधील तज्ज्ञ डॉक्‍टर्सनी मुंबईतील सुमारे 700 खासगी डॉक्‍टर्सना करोनाबाबतीत वैद्यकीय उपचारांबाबत निश्चित काय पद्धती अवलंबवावी याविषयी एकाचवेळी मार्गदर्शन केले आणि त्यांच्या अनेक शंकांचे निरसन केले. विशेष म्हणजे तीन चार दिवसांपूर्वी अशाच पद्धतीने मुंबईतील सुमारे 300 डॉक्‍टर्सशी संवाद साधण्यात आला होता. दूरदृश्‍य प्रणालीद्वारे आयोजित या दोन्ही सभांमध्ये मिळून मुंबईतील सुमारे एक हजार डॉक्‍टर्सनी सहभाग घेतला. अशाच रितीने राज्यातील इतर विभागातील डॉक्‍टर्सशी देखील संवाद साधण्यात येणार आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोना प्रतिबंधात वैद्यकीय क्षेत्र करीत असलेल्या लढाईसाठी त्यांची प्रशंसा केली तसेच येणाऱ्या तिसऱ्या लाटेचा मुकाबला करण्यासाठी सज्ज राहण्यास सांगितले. मुख्यमंत्री म्हणाले की, कोरोना काळात फॅमिली डॉक्‍टर्सची भूमिका अतिशय महत्त्वाची आहे कारण कोणत्याही लहान मोठ्या आजारात रुग्ण पहिल्यांदा आपल्या जवळच्या, परिवाराच्या डॉक्‍टरशी संपर्क साधतो. त्यामुळे त्यांची जबाबदारी खूप महत्त्वाची आहे. सर्वसामान्यांना आपण माझा डॉक्‍टर बनून त्यांना मार्गदर्शन केल्यास रोगाच्या सुरुवातीच्या टप्प्यातच तो रोखण्यात मोठी मदत होणार आहे असे ते म्हणाले.

घरच्या घरी विलगीकरणातील रुग्णांकडे आपण सर्व डॉक्‍टर्सनी लक्ष देणे, त्यांची विचारपूस करीत राहणे गरजेचे आहे, त्यामुळे रुग्णाला मानसिक आधारही मिळतो आणि त्याची तब्येत खालावत असेल तर वेळीच त्याला रुग्णालयात दाखल करणे शक्‍य होते असेही मुख्यमंत्री म्हणाले.

कोविड उपचार केंद्रांमध्येही सेवा द्या
आपल्या परिसरातील कोविड उपचार केंद्र किंवा जम्बो केंद्रांना देखील आपल्या सेवेची गरज आहे हे लक्षात ठेवून खासगी डॉक्‍टर्सनी तिथेही आपली नावे नोंदवावी असे आवाहन करून मुख्यमंत्री म्हणाले की, राज्यात सर्वत्रच उपचार पद्धतीत एकवाक्‍यता असणे फार महत्त्वाचे आहे.

टास्क फोर्सकडून शंकांचे निरसन
यावेळी आरोग्य विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ.प्रदीप व्यास, टास्क फोर्सचे डॉ.संजय ओक, डॉ.शशांक जोशी, डॉ.राहुल पंडित तसेच डॉ.तात्याराव लहाने यांनी कोविड काळातल्या उपचार पद्धतीवर डॉक्‍टर्सना मार्गदर्शन केले व त्यांच्या शंकांचे निरसन केले.

स्टीरॉइड्‌सचा वापर किती प्रमाणात करावा, सहा मिनिटे वॉक टेस्टचे महत्त्व, ऑक्‍सिजनची गरज आहे ते नेमके कसे ओळखावे, बुरशीमुळे होणाऱ्या म्यूकर मायकॉसिस’मध्ये काय उपचार करावेत, ऑक्‍सिजन पातळी धोकादायक स्थितीत आहे म्हणजे नेमके काय, रेमडेसिवीर कधी आणि किती वापरावे, व्हेंटीलेटरवरील रुग्णांची काळजी, रक्त शर्करा स्थिर राहण्याकडे कसे लक्ष द्यावे, कोविड झाल्यानंतरचा किती काळ देखरेख ठेवावी, कोविड झालेल्या रुग्णाने नेमकी कधी लस घ्यावी यावर मोलाचे मार्गदर्शन व शंका निरसन केले. आरटीपीसीआर चाचणीचे महत्त्व, सीटी स्कॅनची नेमकी किती गरज यावरही या सभेत मार्गदर्शन करण्यात आले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.