बर्न – देशाच्या सुरक्षेसाठी स्वित्झर्लंडमध्ये बुरखा, निकाब तसेच कोणत्याही प्रकारच्या मुखवट्याने चेहरा झाकण्यास नागरिकांना बंदी घालण्यात आली आहे. बुरखा, निकाब बंदी संदर्भात झालेल्या मतदानात बहुमताने नागरिकांनी बंदीच्या प्रस्तावाला मंजुरी दिली.
ही बंदी स्वित्झर्लंडमध्ये सर्व समाजातील सर्व नागरिकांसाठी लागू आहे. कोणत्याही कारणाने विशिष्ट मुदतीसाठी स्वित्झर्लंडमध्ये गेलेल्या पाहुण्या नागरिकांनाही बुरखा, निकाब बंदीचे पालन करावे लागणार आहे.
धार्मिक कार्यक्रमाच्या ठिकाणी धार्मिक पेहेरावाला परवानगी असेल. तसेच आरोग्याच्या सुरक्षेसाठी मास्क वापरता येतील. हे अपवाद वगळता सार्वजनिक ठिकाणी वावरताना चेहरा झाकण्यास बंदी आहे. स्वित्झर्लंडमध्ये 7 मार्च रोजी झालेल्या मतदानात (सार्वमत) 51 टक्क्यांपेक्षा जास्त नागरिकांनी बंदीला पाठिंबा दिला. याआधी युरोपमधील नेदरलॅंड (हॉलंड), जर्मनी, फ्रान्स, ऑस्ट्रिया, बेल्जियम आणि डेन्मार्क या देशांमध्ये बुरखा आणि निकाबने चेहरा झाकवण्यावर बंदी आली आहे.
एका मागून एक युरोपमधील देशांमध्ये बुरखा आणि निकाबने चेहरा झाकवण्यावर बंदी लागू होत असल्यामुळे मुस्लिमांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. आधुनिक विचारांच्या मुस्लिमांकडून बंदीचे स्वागत होत आहे. पण जुन्या विचारांच्या मुस्लिमांनी बंदीविषयी नाराजी व्यक्त केली आहे. धार्मिक परंपरांमध्ये सरकारी यंत्रणेच्या माध्यमातून अवास्तव हस्तक्षेप सुरू असल्याची टीका विरोधक करत आहेत.
स्वित्झर्लंडमध्ये बारा वर्षांपूर्वी नव्याने मिनार बांधण्यास बंदी घालण्यात आली. यानंतर आता स्वित्झर्लंडमध्ये बुरखा, निकाब तसेच कोणत्याही प्रकारच्या मुखवट्याने चेहरा झाकण्यास नागरिकांना बंदी घालण्यात आली आहे. स्वित्झर्लंडची लोकसंख्या 86 लाखांपेक्षा जास्त आहे. या लोकसंख्येपैकी जेमतेम पाच टक्के नागरिक मुस्लिम आहेत.