नगर – महापालिकेचे उत्पन्न वाढविण्याच्या दृष्टीने प्रशासनाने प्रयत्न सुरू केले असून व्यवसाय परवाना शुल्क आकारण्याच्या हालचाली महापालिकेकडून सुरू झाल्या आहेत. परवाना शुल्क मधून महापालिकाला सुमारे दोन कोटी उत्पन्न अपेक्षित असून त्याची अंमलबजावणी लवकरच सुरू करण्याचा प्रयत्न सुरू आहे.
नगर शहरातील सर्व प्रकारच्या व्यावसायिक आस्थापना, दुकानांना अधिनियमातील तरतुदीनुसार व्यवसाय परवाना शुल्क आकारण्यात येणार आहे. शहरात सुमारे 30 ते 40 हजार आस्थापना आहे.त्याची अंमलबजावणी करण्याच्या हालचाली महापालिकेकडून सुरू झाल्या आहेत. तसा प्रस्ताव आयुक्तांकडे मंजुरीसाठी सादर करण्यात आला आहे.
महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम 1949 मधील प्रकरण 22 कलम 372 ते 386 नुसार लायसन्स आणि परवान्यासाठी शासनाने कलम 454 अवये 339 प्रकारच्या व्यवसायांना 10 ऑक्टोबर 2006 रोजीच्या शासन निर्णयानुसार मान्यता दिलेली आहे. महापालिकेच्या आर्थिक उत्पन्नात वाढ होण्याच्या दृष्टीने व्यवसाय परवाना शुल्क आकारणे आवश्यक आहे.
त्यामुळे सर्व व्यवसायिक आस्थापनांचे सर्वेक्षण प्रभागनिहाय करणे व त्यांना परवाना शुल्क आकारणी करणे आवश्यक असल्याचा प्रस्ताव स्थायी समितीकडे सादर करण्यात आला होता. अकोले महापालिकेच्या धर्तीवर विविध प्रकारच्या आस्थापनांना 200 ते 15 हजारांपर्यंत वार्षिक शुल्काचा दर प्रस्तावित करण्यात आला होता. त्याला स्थायी समितीची मंजुरी मिळालेली आहे.
मार्केट विभागाकडून आता व्यवसाय परवाना शुल्काची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. मनपा आयुक्तांनी मंजुरी मिळताच यासंदर्भात जाहीर नोटीस प्रसिध्द करून व्यावसायिक आस्थापनांना नोंदणीसाठी आवाहन करण्यात येणार आहे. मनपाच्या मार्केट विभागात अर्ज उपलब्ध करून दिले जाणार आहेत. कोणत्या प्रकारच्या आस्थापनांना किती शुल्क आकारले जाणार, याची माहिती संकेतस्थळावर उपलब्ध करून दिली जाणार आहे. मुदतीत व्यवसाय परवाना शुल्क न भरणाऱ्या आस्थापनांवर कारवाई केली जाणार आहे.