कोपरगाव – कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील रस्त्यांसाठी निधी मिळावा यासाठी केलेल्या प्रयत्नातून अनेक रस्त्यांना प्रशासकीय मंजुरी मिळालेली आहे. त्यापैकी तीन महत्त्वाच्या रस्त्यांच्या 17 कोटींच्या निविदा प्रसिद्ध झाल्या असून, लवकरच या रस्त्यांच्या कामांना प्रारंभ होणार असल्याची माहिती आ. आशुतोष काळे यांनी दिली आहे.
मतदारसंघाच्या रस्ते विकासाचा अनुशेष बहुतांश प्रमाणात भरून निघाला असून, उर्वरित रस्त्यांच्या विकासासाठी सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. त्या पाठपुराव्यातून मुख्यमंत्री ग्रामसडक योजना व पंतप्रधान ग्रामसडक योजनेच्या मतदारसंघातील तीन महत्त्वाच्या रस्त्यांच्या 17 कोटींच्या निविदा प्रसिद्ध झाल्या आहेत.
यामध्ये मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून तालुक्यातील रांजणगाव देशमुख ते बहादरपूर या जवळपास 5 किलोमीटर रस्त्यासाठी 4 कोटी 11 लाख 90 हजार, तसेच राहाता तालुक्यातील पुणतांबे-नपावाडी या साडेपाच किलोमीटर रस्त्यासाठी मुख्यमंत्री ग्रामसडक टप्पा 2 योजना (सर्वसाधारण) (डीपीसी) अंतर्गत 5.20 कोटी व पोहेगाव-देर्डे चांदवड ते कुंभारी रस्ता (7.81 कोटी) अशा एकूण जवळपास 17 कोटींच्या निविदा प्रसिद्ध झाल्या आहेत.
या रस्त्यांच्या कामांना लवकरच प्रारंभ होणार असल्यामुळे खराब रस्त्यांचा त्रास सहन करीत असलेल्या नागरिकांची या त्रासातून मुक्तता करण्यासाठी शहरासह ग्रामीण भागातील बहुतांश रस्ते विकसित केले आहेत, असे आ. काळे यांनी सांगितले आहे.