कोल्हापूर – शाळेला सुट्ट्या लागल्याने मामाच्या गावाला जाताना अपघातात कागल तालुक्यातील कसबा सांगावमधील 15 वर्षीय शाळकरी मुलीचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना पुणे-बंगळुरू मार्गावर घडली आहे. राष्ट्रीय महामार्गावरील कोगनोळीजवळ सेल टॅक्स नाक्यासमोर ही घटना घडली. ट्रकने मागून धडक दिल्याने हा अपघात घडला.
श्रेया हेमंतकुमार हळीज्वाळे (वय 15) असे ट्रकखाली सापडून मृत्यू पावलेल्या मुलीचे नाव आहे. शाळेला सुट्ट्या लागल्याने श्रेया आपल्या मामासोबत दुचाकीवरून जात होती. ते कोगनोळीजवळील टोल नाक्याजवळ आले असता त्यांच्या दुचाकीला पाठिमागून येणाऱ्या ट्रकने धडक दिली. या धडकेत श्रेया आणि तिचे मामा शशीधर दोघेही खाली पडले मात्र श्रेया थेट ट्रकच्या खाली सापडली. तिच्या डोक्यावरून ट्रकचे चाक गेले. या दुर्घटनेत तीचा जागीच मृत्यू झाला तर मामा बाजूला पडल्याने किरकोळ जखमी झाले.
श्रेया ही हेमंतकुमार यांची एकुलती एक मुलगी होती. तिच्या अशा अपघाती निधनाने कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. तिच्या पश्चात आई, वडील, आजी, आजोबा असा परिवार आहे. कुटुंबियांचा आक्रोश उपस्थितांचे ह्रदय पिळवटुन टाकणारा होता. ती सध्या आठवीच्या वर्गात शिकत होती. शाळेल्या सुट्या लागल्यामुळे ती मामासोबत आपल्या आजोळी जात होती.