नगर -गुरुमाऊली मंडळाच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा प्राथमिक शिक्षक बॅंकेने 2016 पासून काटकसरीच्या कारभाराची परंपरा कायम राखत सन 2022- 23 या आर्थिक वर्षी 14 कोटी 83 लाख रुपयांचा ढोबळ नफा मिळविला असून मागील आर्थिक वर्षात पाऊण टक्के व्याजदर कमी केल्याने सुमारे सात कोटी रुपयांचे उत्पन्न कमी होऊन देखील नफा मिळविणे शक्य झाल्याची माहिती शिक्षक बॅंकेचे अध्यक्ष संदीप मोटे यांनी दिली.
गुरुमाऊली मंडळाच्या परंपरेनुसार सभासदांना यावर्षी 9 टक्के लाभांश देण्याची शिफारस संचालक मंडळाने केल्याची माहिती उपाध्यक्ष कैलास सारोक्ते यांनी दिली.मागील आर्थिक वर्षात बॅंकेला झालेल्या 14 कोटी 83 लाख रुपयांच्या ढोबळ नफ्यातून पाच कोटी दहा हजार रुपयांच्या आवश्यक तरतुदी वजा करून नऊ कोटी 82 लाख रुपये निव्वळ नफा झाला असून त्यातून बॅंकेच्या सभासदांना विक्रमी असा नऊ टक्के लाभांश देण्याची शिफारस संचालक मंडळांनी केली आहे.
31 मार्च अखेर बॅंकेचे 10 हजार 678 सभासद असून बॅंकेचे वसूल भाग भांडवल 74 कोटी तीन लाख रुपये आहे. सर्व फंडस 28 कोटी 78 लाख रुपयांचे असून ठेवी 1296 कोटी 24 लाखाचे आहेत तर बॅंकेचे कर्ज वाटप 985 कोटी 12 लाख रुपये आहे. बॅंक आपल्या सभासदांना 38 लाख रुपये पर्यंत कर्ज वाटप करते. मागील आर्थिक वर्षांमध्ये सभासद कल्याण निधी मधून शुभमंगल योजनेअंतर्गत 11 हजार रुपये प्रमाणे 289 सभासदांना 31 लाख 79 हजार रुपयांचे वाटप करण्यात आले आहे. 76 सभासदांना वैद्यकीय मदती पोटी 14 लाख 25 हजार रुपये देण्यात आले आहेत. सभासद व पाल्यांना आचार्य दोंदे व भा. दा. पाटील पारितोषिक अंतर्गत एक लाख 23 हजार रुपये व सन्मान चिन्ह यांचे वाटप करण्यात आले आहे. बॅंकेच्या मयत सभासद कर्ज निवारण निधीमधून वीस मयत सभासदांचे एकूण दोन कोटी 90 लाख रुपयांचे कर्ज माफ करण्यात आले आहे. असे मोटे म्हणाले.
गुरुमाऊली मंडळाने निवडणुकीमध्ये बॅंकेच्या कर्ज व्याजदरात वाढ न करता कर्जाचा व्याजदर 7 टक्केपर्यंत करण्याचे आश्वासन सभासदांना दिलेले आहे. गेल्या आर्थिक वर्षात आरबीआयने रेपो रेट दरामध्ये वेळोवेळी वाढ करून ही शिक्षक बॅंकेच्या कर्ज व्याजदरात मात्र वाढ करण्यात आली नाही.उलट पाऊण टक्के व्याजदर कमी करण्यात आला.त्यामुळे बॅंकेचे उत्पन्न सात कोटीने कमी आले. ठेवीवरील व्याजदरामध्ये वाढ करण्यात आली असून भविष्यात कर्जाचा व्याजदर कमी करुन सभासदांना अधिकचा दिलासा कसा देता येईल.
बापूसाहेब तांबे नेते,गुरुमाऊली मंडळ