नवी दिल्ली – परदेशी संस्थागत गुंतवणूकदार भारतीय शेअर बाजारात गुंतवणूक करण्याबाबत सावध झाले आहेत. जानेवारी महिन्यात आतापर्यंत म्हणजे पहिल्या तीन आठवड्यामध्ये या गुंतवणूकदारांनी 13,000 कोटी रुपयांच्या शेअरची विक्री केली आहे. शेअर बाजाराचे निर्देशांक उच्च पातळीवर असल्यामुळे कंपन्यांच्या शेअरचे भाव आवश्यकतेपेक्षा जास्त आहेत, असा समज बाजारात पसरला आहे. अमेरिकन कर्जरोख्यावरील परतावा वाढत असल्यामुळे परदेशी गुंतवणूकदार अमेरिकेतील कर्जरोख्यात गुंतवणूक करणे पसंत करीत आहेत.
17 आणि 19 जानेवारी रोजी परदेशी संस्थापक गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजारातून तब्बल 24 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक काढून घेतली होती. त्या गुंतवणूकदारांनी डिसेंबर महिन्यात भारतीय शेअर बाजारात 16,134 कोटी रुपयांची गुंतवणूक केली. नोव्हेंबर महिन्यातही या गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजारात 9000 कोटी रुपयांची गुंतवणूक केली होती. त्यानंतर अमेरिकेतील आर्थिक परिस्थिती अपेक्षा पेक्षा जास्त सुधारली आहे. त्यामुळे अमेरिकेला सध्या तरी व्याजदरात कपात करण्याची गरज नाही असे वातावरण निर्माण झाले आहे.
अमेरिकेचे व्याजदर सध्या 40 वर्षाच्या उच्चांकावर आहेत. महागाई कमी करण्याला अमेरिकेने सर्वात जास्त प्राधान्य दिले आहे. सध्याच्या व्याजदरावरही अमेरिकेतील अर्थव्यवस्था सुधारत आहे. त्यामुळे अमेरिका इतक्यात व्याजदरात कपात करणार नाही असे वाटत आहे.
परिणामी डॉलर बळकट होत आहे. अमेरिकेच्या कर्जरोख्यावरील परतावा वाढत आहे. अमेरिकेच्या दहा वर्षावरील दहा वर्षाच्या कर्जरोख्यावरील परतावा सध्या 4.15 टक्क्यावर गेला आहे. परकीय गुंतवणूकदारांची एचडीएफसी बँकेत जास्त गुंतवणूक होती. मात्र एचडीएफसी बँकेच्या या बँकेच्या शेअरची जास्त विक्री केली.
या गुंतवणूकदारांनी जरी शेअर बाजारातून गुंतवणूक काढून घेतली असली तरी या गुंतवणूकदारांनी भारतीय कर्जरोख्याची खरेदी जोरात चालू ठेवली असून जानेवारीच्या पहिल्या तीन आठवड्यात परदेशी गुंतवणूकदारांनी कर्जरोख्यामध्ये 15,647 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. शेअरपेक्षा भारतीय कर्जरोख्यात केलेली गुंतवणूक परकीय गुंतवणूकदारांना सुरक्षित वाटत आहे. जेपी मॉर्गनने आपल्या जागतिक कर्जरोखे निर्देशांकात जून महिन्यापासून भारताचा समावेश करणार असल्यामुळे परकीय गुंतवणूकदार भारतीय रोख्यात गुंतवणूक करीत आहेत.