संगमनेर (प्रतिनिधी) – जमीन व गौण खनिज महसूल यातून मार्च अखेरपर्यंत संगमनेर महसूल विभागाला 20.05 कोटी इतके उद्दिष्ट देण्यात आले होते. मार्च अखेरपर्यंत संगमनेर तहसीलने 22.34 कोटी इतकी वसुली पूर्ण केली आहे. मागील वर्षी देखील 100 टक्के वसुली पूर्ण करण्यात यशस्वी असलेल्या संगमनेर महसूल विभागाने प्रांताधिकारी हिंगे यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदार धीरज मांजरे यांच्यासह महसूल कर्मचाऱ्यांनी यावर्षी 111.45 वसुली पूर्ण करून नवीन उच्चांक केला आहे.
महसूल विभागाच्या अंतर्गत जमीन महसूल, अनधिकृत अकृषक कर नजराणा प्रकरणे, मोबाईल टॉवर, इतर कर तसेच गौण खनिज परवाने, शासकीय यंत्रणा स्वामित्व धन, अनधिकृत गौण खनिज या माध्यमातून संगमनेर महसूलसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून 8.17 जमीन महसूलीचे उद्दिष्टे देण्यात आले होते.
जमीन महसूल वसुली अंतर्गत शेतसारा, बिनशेती सारा, अनधिकृत अकृषक कर, नजराणा प्रकरणे, मोबाईल टॉवर व इतर कर यामधून शासनाला 4.29 कोटी भरणा संगमनेर तहसीलमार्फत करण्यात आला आहे. तसेच, गौणखनिज परवाने, विविध शासकीय विभाग रॉयल्टी रक्कम, अवैध गौणखनिज वाहतूक दंड इत्यादी माध्यमातून 18.05 कोटी भरणा करण्यात आला आहे.
निवासी नायब तहसीलदार ऋतुजा पारखे, महसूल नायब तहसीलदार राजेश पवार,परिविक्षाधीन नायब तहसीलदार मंदार जाधव, शिरस्तेदार श्रीकांत लोमटे, अव्वल कारकून गणेश मंडलिक,रणशूर, महसूल सहाय्यक शिंदे, मंडळअधिकारी, तलाठी व कोतवाल, कार्यालयीन कर्मचारी यांच्या अथक परिश्रमातून तालुका महसूल वसुलीच्या 20.05 कोटी उद्दिष्टाच्या अनुषंगाने 20.34 कोटी रक्कम वसूल करून 111.45 टक्के वसुली झाली.
प्रांताधिकारी शैलेश हिंगे यांनी वेळोवेळी केलेले मार्गदर्शन, वस्तुनिष्ठ नियोजन यामुळे यावर्षी महसूल वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यात संगमनेर तालुक्याला यश मिळाले.- धीरज मांजरे तहसीलदार, संगमनेर