पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहरातील 87 हजार 456 मालमत्ता धारकांनी 2023-24 च्या आर्थिक वर्षातील दीड महिन्यात शंभर कोटींचा कर महापालिका तिजोरीत जमा केला आहे. यामधील 70 हजार मालमत्ता धारकांनी ऑनलाईन कराचा भरणा करून विविध सवलतींचा लाभ घेतला आहे. तसेच नागरिकांनी 30 जूनपूर्वी कर भरुन विविध सवलतींचा लाभ घ्यावा, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.
महापालिकेच्या उत्पन्नाचा मुख्य स्रोत हा मालमत्ता कर आहे. त्यामुळे आयुक्त शेखर सिंह यांनी कराची जास्तीत जास्त वसुली व्हावी, यासाठी निरंतर कर वसुली, सर्वंकष मालमत्ता सर्वेक्षण आणि माहितीचे शुद्धीकरण, अशी त्रिसूत्री आखून दिलेली आहे. शहरात 5 लाख 98 हजार मालमत्ता आहेत. महापालिकेने बचत गटांना मालमत्ता कराची बिले वाटप करण्याचे काम दिले आहे. या महिलांनी निम्म्यापेक्षा जास्त मालमत्ता धारकांना घरपोच बिलांचे वाटप केले आहे. दिड महिन्यात 87 हजार 456 मालमत्ता धारकांनी शंभर कोटी, 72 लाख रूपयांचा कर पालिका तिजोरीत जमा केला आहे. याचबरोबर 31 मार्च 2023 अखेर ज्यांची 1 लाखांपेक्षा जास्त थकबाकी होती, अशा 22 हजार मालमत्तांना जप्ती पूर्व नोटीस देण्याचे मिळकत कराच्या बिलाबरोबर काम सुरू आहे. बिलांचे वाटप होताच जप्तीची कारवाई करण्यात येणार असल्याचे सहाय्यक आयुक्त नीलेश देशमुख यांनी सांगितले.
प्रकल्प सिद्धीच्या माध्यमातून बचत गटाच्या महिला भगिनींनी गेल्या वीस दिवसात निम्म्यापेक्षा जास्त मालमत्तांची बिले वितरीत केली आहेत. बहुतांशी मालमत्तांची माहितीही अपडेट झालेली आहे. याचा वसुलीवर सकारात्मक परिणाम झालेला दिसून येतो. महिला आर्थिक विकास महामंडळ आणि पालिका यांचा हा संयुक्त उपक्रम इतर महापालिकांसाठी आदर्श ठरू शकेल.
– शेखर सिंह, आयुक्त
कर संकलन विभागाची गेल्या वर्षापासून सक्षम बांधणी करण्यात येत आहे. आयुक्तांनी घालून दिलेल्या त्रिसुत्रीनुसार कर संकलन विभाग काम करत आहे. तीन जूनपुर्वी वार्षिक उद्दिष्टाच्या पन्नास टक्के वसुली करण्याचे उद्दिष्ट आहे. सवलतींचा लाभ घेण्यासाठी नागरिकांनी 30 जूनपूर्वी कराचा भरणा करणे आवश्यक आहे. – नीलेश देशमुख, सहायक आयुक्त