पुणे : सिंहगड रस्त्यावरील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी महापालिकेकडून राजाराम पूल ते फन टाईम चित्रपटगृहा पर्यंत उड्डाणपूल उभारला जाणार आहे. या कामासाठी प्रशासनाकडून फेरनिविदा काढण्यात आली आहे. या पूर्वी काढण्यात आलेले निविदांचे दर अधिक असल्याने ही निविदा रद्द करण्यात आली होती. त्यानंतर पुन्हा एकदा निविदा काढण्यात आल्या आहेत. सुमारे 2. 6 किलोमीटरचा हा पूल असणार असून यात दोन पूल असणार आहेत. या कामासाठी सुमारे 135 कोटीचा खर्च अपेक्षित असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.
गेल्या काही वर्षात सिंहगड रस्ता परिसरात मोठया प्रमाणात नागरिकरण वाढले आहे. तर या भागाकडे जाण्यासाठी एकच रस्ता असल्याने या रस्त्यावर सकाळी आणि संध्याकाळी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होऊन या रस्त्यावर ताशी अवघे 7 ते 8 किलोमीटर वाहनांचा वेग असतो. त्यामुळे या रस्त्याला पर्यायी रस्ता करण्याची मागणी केली जात होती. त्यासाठी पालिकेने नदीपात्रातून विठ्ठलवाडी ते वारजे रस्ता विकसितही केला होता. मात्र, पर्यावरण प्रेमींनी या रस्त्यास विरोध केल्याने हा रस्ता उखडून टाकण्यात आला होता.
त्यानंतर या भागातील स्थानिक नगरसेवकांकडून वारंवार या रस्त्याला पर्यायी रस्ता अथवा उड्डाणपूल उभारण्याची मागणी केली जात होती. त्यानंतर गेली तीन वर्षे या रस्त्यासाठी पालिकेच्या अंदाजपत्रकात तरतूदही करण्यात येत आहे. मात्र, मागील वर्षी प्रशासनाने या पुलाचा प्रकल्प आराखडा करून दोन पूल प्रस्तावित केले आहेत, त्यात एक पूल राजारामपूल चौकात स्वारगेटकडे जाणाऱ्या वाहनांसाठी तर दुसरा पूल राजारामपूला पासून थेट फनटाईम पर्यंत असणार आहे. त्यामुळे या रस्त्यावरील वाहतूक कोंडीतून नागरिकांची सुटका होणार आहे, मागील वर्षी या पूलासाठी काढलेल्या निविदा जादा दराने आल्याने रद्द करण्यात आल्या होत्या. त्यानंतर पुन्हा निविदा जाहीर करण्यात आल्या आहेत.
या पूलाच्या उभारणीसाठी सातत्याने प्रशासनाकडे पाठपुरावा सुरू आहे. त्यासाठी स्थायी समिती सदस्य असताना अंदाजपत्रकात तरतूद करून घेतली होती. त्यानंतर सल्लागार नेमणे, सर्वेक्षण, आराखडा करणे यात कालावधी गेला असून निविदाही काही तांत्रिक कारणास्तव रद्द करण्यात आल्या होत्या. मात्र, या पूलाच्या पुन्हा फेरनिविदा काढल्या असून त्याचे काम लवकरात लवकर सुरू करण्यात येईल- मंजूषा नागपूरे ( स्थानिक नगरसेविका)