पुणे : राज्यशासनाकडून संपूर्ण राज्यासाठी निश्चित करण्यात आलेल्या एकात्मिक बांधकाम विकास नियमावलीत 6 ते 9 मीटर रस्त्यांसाठी बेसिक एफएसआय 2 असावा तसेच प्रिमिएम एफएसआय घरमालक अथवा विकसकाला देण्यात यावा अशी मागणी कसबा विधानसभा मतदारसंघाच्या आमदार मुक्ता टिळक यांनी नगरविकास विभागाचे मुख्य सचिव भूषण गगराणी यांच्याकडे केली आहे. या नियमावलीमुळे शहरातील जुन्या वाडयांचा पुनर्विकास अडचणीत आला आहे. ही बाब लक्षात घेऊन या नियमवलीतील तरतूदीबाबत आमदार टिळक यांनी गगराणी यांच्या समवेत व्हीसी द्वारे चर्चा केली. यावेळी त्यांनी ही मागणी केली. वास्तुविशारद शैलेश साळे हित्तल, शैलेश टिळक उपस्थित होते.
या वेळी आमदार टिळक यांनी या नियमवलीतील तरतूदीमुळे जुन्या पेठांमधील दिड लाख लोकसंख्या बाधित होत आहे. ही बाब लक्षात घेऊन 6 ते 9 मीटर रस्त्यावर बेसिक एफएसआय 2 असावा. प्रीमियम एफएसआय घरमालक अथवा विकसकाला देण्यात यावा, पेठांमधील वाडे लहान असल्यानेअ इमारतीची उंची 15 मीटरपेक्षा जास्त आहे, त्यासाठी चारही बाजूंना1 मिटर सामासिक अंतर ठेवण्याच्या सुचनेचा पुन:विचार करावा, सेस बाबत गावठाणमधील जुन्या वाड्यांमध्ये भाडेकरूंना देण्यात येणाऱ्या जागेवरच आकारण्यात यावा. यामुळे गावठाणातील भागाचा विकास होईल. सर्वेनुसार 1.5 लाख लोकसंख्या या युनिफाईड डीसी रूलमुळे बाधीत होत असल्याने याबाबत शासनाने सकारात्मक भूमिका घेऊन तातडीनं बदल करावेत अशी मागणी आमदार टिळक यांनी केली असून गगराणी यांनीही सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन यावेळी दिले असल्याचे आमदार टिळक यांनी सांगितले.