पुणे : बालवाडी शिक्षिकांना मिळणारे मानधन अतिशय तुटपुंजे असून त्यात वाढ करण्याची मागणी या शिक्षिकांकडून महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांच्याकडे करण्यात आली. भाजपचे शहराध्यक्ष जगदिश मुळीक, भाजपचे नगरसेवक प्रसन्न जगताप, माजी स्थायी समिती अध्यक्ष योगेश मुळीक यांच्यासह बालवाडी शिक्षिका यावेळी मोठया संख्येने उपस्थित होत्या. यावेळी आयुक्तांनी शिक्षण विभागाशी चर्चा करून मानधनवाढीबाबत प्रस्ताव ठेवण्यात यावा अशी विनंती शहराध्यक्ष मुळीक यांनी महापालिका आयुक्तांकडे केली.
पुणे शहरामध्ये साधारणतः अकराशे ते बाराशे बालवाडी शिक्षिका आहेत. या शिक्षिकांकडूनच चांगले व हुशार विद्यार्थी घडवले जातात आणि हीच मुले पुढील शिक्षणासाठी मनपा शाळेत प्रवेश घेतात. परंतु या बालवाडी शिक्षिकांनाच जर मानधन कमी असेल तर पुढे जाऊन त्याचा मनपा शाळेतील विद्यार्थी पटसंख्येवर मोठा परिणाम होऊ शकतो याकडे देखील शहराध्यक्ष मुळीक आयुक्तांचे लक्ष वेधले. यावर आयुक्तांनी शिक्षण मंडळाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून लवकरच योग्य तो निर्णय घेण्यात येईल असे आश्वासन यावेळी महापालिका आयुक्त गायकवाड यांनी दिले. या वेळी शिक्षिकांच्या वतीने महापालिका आयुक्तांना आपल्या मागणीचे निवेदन देण्यात आले.