नवी दिल्ली : कोरोनाग्रस्त इराणमध्ये अडकलेल्या 300 भारतीयांच्या रक्तांचे नमुने घेऊन इराणी विमान शुक्रवारी रात्री येणार आहे. इराणमध्ये महन एअरचे विमान परतताना इराणी प्रवाशांना घेऊन जाईल, असे नागरी उड्डाण महासंचालक अरूण कुमार यांनी सांगितले.
त्या रक्ताची तपासणी केल्यानंतर त्यातील निगेटिव्ह असणाऱ्या भारतीयांना इराणमधून भारतात आणण्यात येईल. इराणमध्ये सुमारे दोन हजार भारतीय अडकले आहेत. त्यातील बहुतांश कारगील भागातील आहेत. इराकमध्ये ते यात्रेसाठी गेले होते. मात्र कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे दोन देशातील विमान सेवा खंडित केल्याने त्यांना अडकून पडावे लागले.
त्यांना आणण्यासाठी पाठवण्यात येणाऱ्या विमानात बसण्यापुर्वी त्यांच्या प्रकृतीची तपासणी करण्यात येईल. त्यासाठी भारतीय डॉक्टरांचे पथक रवाना झाले आहे.
भारतीय नागरिकांची तपासणी करण्यासाठी इराणमध्ये क्लिनिक उभारणार असल्याची माहिती परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी गुरूवारी दिली होती. आपल्या नागरिकांना परत आणण्यासाठी भारत सरकार इराण बरोबर चर्चा करत असल्याचे त्यांनी सांगितले होते.