कुसगाव बुद्रुक – सिंहगड संकुल लोणावळा राष्ट्रीय सेवा योजना आयोजित “लोकजागर- 2020′ हा समाज प्रबोधनात्मक कार्यक्रम उत्साहात झाला. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून भारती विद्यापीठाचे रेखाचित्रकार प्रा. डॉ. गिरीश चरवड, अहमदनगरच्या स्नेहालयाच्या प्रतिनिधी शुभांगी कोपरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत होती.
या वेळी बोलताना डॉ. गिरीश चरवड यांनी कलेचा सामाजिक कार्यासाठी उपयोग कसा केला जातो तसेच कला ही मनुष्याचे आयुष्य कसे घडू शकते या विषयी मार्गदर्शन केले. तसेच शुभांगी कोपरकर यांनी स्नेहालय या संस्थेविषयी माहिती दिली. स्नेहालय अहमदनगर ही संस्था अनाथ, एड्स बाधित, अत्याचारित महिला यांचे संगोपन करते. आयुष्यामध्ये सामाजिक कार्य करणे गरजेचे आहे याविषयीचे महत्त्व त्यांनी विद्यार्थ्यांना पटवून दिले.
दरम्यान, राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवकांनी विविध सामाजिक विषयावर समाज प्रबोधनात्मक ग्रामीण बाज असलेल्या नाटिका सादर केल्या. यामध्ये “आपली माती आपली माणसं’, “वाहतूक नियम’, “राष्ट्रवाद’, “वृद्धाश्रम’, “आजची युवा पिढी’ हे विषय घेण्यात आले. तसेच स्वयंसेवकांनी “व्यसनाधीनता’, “मी भारताचा सैनिक’, “वाघ्या-मुरळी’, “भारुड’, “गणेश वंदना’, “एक भारत, श्रेष्ठ भारत’ या उपक्रमांतर्गत ओडिसा नृत्य सादर करण्यात आले. तसेच या दरम्यान “शिवबा रायबा’, “मी निर्भयाचा वडील बोलतोय’, गायन व महाराष्ट्रीय संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सिंहगड संकुलाचे संचालक, प्राचार्य डॉ. एम. एस. गायकवाड, तसेच संकुलातील सर्व महाविद्यालयांचे प्राचार्य, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी व स्वयंसेवकांनी विशेष प्रयत्न केले.