- चोपही दिला; पिंपरी चिंचवड पोलिसांची कारवाई
- एकूण 345 जणांवर कारवाईचा बडगा
पिंपरी – सरकारी आदेशाचे उल्लंघन करून जीवनावश्यक वस्तू आणि सेवा यांच्या व्यतिरिक्त इतर दुकाने उघडी ठेवल्यास पोलिसांकडून त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. आता संचारबंदीच्या काळात विनाकारण घराबाहेर फिरणाऱ्या नागरिकांवर देखील पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. त्यामुळे नागरिकांना विनाकारण घराबाहेर पडणे चांगलेच महागात पडू शकते. आत्तापर्यंत पोलिसांनी 345 जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
सरकारी आदेशाला केराची टोपली दाखवत दुकाने सुरू ठेवणाऱ्या, तसेच संचारबंदीच्या काळात विनाकारण बाहेर घुटमळणाऱ्या एकूण 86 जणांवर मंगळवारी (दि. 24) आली आहे. 13 मार्च 2020 पासून राज्यात साथरोग प्रतिबंधात्मक कायदा 1897 लागू करण्यात आला आहे. राज्यातील सर्व महापालिका, नगरपालिका, नगर पंचायतीच्या क्षेत्रातील सर्व शॉपिंग मॉल, दुकाने, आस्थापना, चित्रपटगृहे, जलतरण तलाव, व्यायाम शाळा, नाट्यगृहे, आंगणवाड्या, शाळा, महाविद्यालये बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, क्रीडा विषयक कार्यक्रमांना पुढील आदेशापर्यंत परवानगी देण्यात येऊ नये. तसेच यापूर्वी दिलेल्या परवानग्या रद्द कराव्यात, असेही आदेशात म्हटले आहे. एका ठिकाणी होणारी गर्दी टाळण्यासाठी सर्व शॉपिंग मॉल, दुकाने, आस्थापना पुढील आदेशापर्यंत बंद राहतील.
अत्यावश्यक किराणा सामान, दूध, भाजीपाला, औषधे आणि अन्य जीवनावश्यक वस्तूंची दुकाने वगळण्यात आली आहेत. मात्र, जिलाधिकाऱ्यांच्या आदेशाकडे कानाडोळा करून काही दुकानदार दुकाने सुरूच ठेवत आहेत. त्या दुकानदारांना समजावण्यासाठी पोलीस रस्त्यावर उतरले आहेत. समज देऊनही दुकाने सुरु ठेवल्यास पोलिसांकडून संबंधित दुकानदारांवर प्रशासनाच्या आदेशाकडे दुर्लक्ष केल्याप्रकरणी भारतीय दंड विधान कलम 188 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात येत आहेत.
गुरुवारी (दि. 19) 129, शुक्रवारी (दि. 20) 80, शनिवारी (दि. 21) 29, रविवारी (दि. 22) 6, सोमवारी (दि. 23) 15, मंगळवारी (दि. 24) 86 दुकांदार आणि नागरिकांवर कारवाई करण्यात आली आहे. अशा एकूण 345 जणांवर कारवाईचा बडगा उगारला आहे.