रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे वृद्ध महिलेचा मृत्यू
तळेगाव दाभाडे – तळेगाव स्टेशन येथील जनरल हॉस्पिटलच्या हलगर्जीपणामुळे एका वृद्ध महिलेला आपला जीव गमवावा लागला आहे, असा आरोप करत मनसे देहूरोड शहर महिला आघाडीच्या वतीने जनरल हॉस्पिटलच्या बाहेर एक दिवसीय लाक्षणिक उपोषण केले.
याबाबत मनसे महिला आघाडीच्या देहूरोड शहर अध्यक्षा अनिता मंगवानी यांनी जिल्हाधिकारी, तहसीलदार आणि तळेगाव पोलिसांना निवेदन देऊन रुग्णालयावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. मनसे महिला आघाडीच्या अनिता मंगवानी, सुनीता देवर, नीरजा ठोसर, प्रियांका ठोसर यांनी हे उपोषण केले.
जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, मंगवानी यांच्या नातेवाईक बबनबाई परशुराम मोरे (वय 78, रा. पारशीचाळ, देहूरोड) यांना 21 जुलै रोजी उलट्या आणि चक्कर येत असल्याने तळेगाव स्टेशन येथील जनरल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, रुग्णालयाने 21 ते 27 जुलै या कालावधीत मोरे यांना करोना संशयित म्हणून कोविड वॉर्डमध्ये ठेवले. त्या सहा दिवसात मोरे यांच्यावर रुग्णालयाने कोणतेही उपचार केले नाहीत. पैशांच्या अभावी रुग्णालयाने मोरे या वृद्ध महिला रुग्णाकडे दुर्लक्ष केले. योग्य उपचार न मिळाल्याने मोरे यांचा 1 सप्टेंबर रोजी मृत्यू झाला. हा मृत्यू रुग्णालयाच्या निष्काळजीपणा आणि हलगर्जीपणामुळे झाला आहे. यासाठी जनरल हॉस्पिटलवर कारवाई करण्यात यावी. मोरे यांच्या उपचारासाठी महात्मा फुले जन आरोग्य योजना लागू असतानाही रुग्णाकडून हॉस्पिटलने बिल घेतले आहे, असेही निवेदनात म्हटले आहे.
हॉस्पिटल प्रशासनाच्या बेजबाबदारपणाच्या विरोधात मनसे देहूरोड शहर महिला आघाडीच्या अध्यक्षा मंगवानी यांनी गुरुवारी (दि. 3) रुग्णालयाच्या बाहेर एक दिवसीय लाक्षणिक उपोषण केले. मनसेचे मावळ तालुक्यातील पदाधिकारी मोझेस दास, संजय शिंदे, भरत बोडके, निरंजन चव्हाण तसेच पिंपरी चिंचवडचे कैलास कदम यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेतली. तसेच महाराष्ट्र विकास समितीच्या शिष्टमंडळानेही आंदोलनकर्त्यांची भेट घेत आंदोलनाला पाठिंबा दिला. दरम्यान, या संदर्भात रुग्णालय प्रशासनाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न मात्र संपर्क होऊ शकला नाही.