भाटघर – सांगली, कोल्हापूर येथील पूरपरिस्थितीमुळे हजारो नागरिक बेघर झाले आहेत. पूरग्रस्तांना महाराष्ट्राच्या अनेक ठिकाणांहून मदतीसाठी हात पुढे सरसावले आहेत. भोर महावितरणचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी पूरग्रस्त नागरिकांना मदत करण्यासाठी एक लाख रुपयांपेक्षा अधिक किंमतीचे साहित्य जमा केले आहे.
सदर साहित्य पुणे येथील महाराष्ट्र देशा फाउंडेशन या सेवाभावी संस्थेमार्फत कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड येथे वितरित केले जाणार आहे. यासाठी महावितरण उपविभाग भोर येथील उपकार्यकारी अभियंता संतोष चव्हाण, सहाय्यक अभियंता योगेश नायकवडी, निवृत्त कर्मचारी केशव बांदल, ठेकेदार मारुती कंक, वरिष्ठ तंत्रज्ञ विश्वनाथ किंद्रे व इतर कर्मचाऱ्यांनी विशेष प्रयत्न केले.