भुलेश्वर – भगवान प्रभू श्री रामचंद्रांच्या अयोध्या येथील मंदिराच्या भूमिपूजन समारंभानिमित्त भोलेश्वर (ता. पुरंदर) महादेवाच्या डोंगरावरील श्री राम मंदिरात बुधवारी (दि. 5) पुजारी मंडळाच्या वतीने आकर्षक पूजा करून महाआरती करण्यात आली यावेळी विविध फुलांनी आकर्षक सजावट केली होती
सतराव्या शतकामध्ये छत्रपती शाहू महाराजांचे व पेशव्यांचे गुरू श्री ब्रह्मेंद्रस्वामी यांनी श्री भुलेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार केला यावेळी त्यांनी हे ठिकाण आवडले म्हणून या ठिकाणी समाधी घेण्याचा निश्चय केला होता. समाधी घेण्यासाठी नियोजन करून मंदिर सुद्धा बांधले त्या ठिकाणी भगवान प्रभू श्रीरामचंद्रांच्या मूर्तीची स्थापना करून त्याच मंदिरामध्ये समाधी घेण्याचा निश्चय केला; मात्र सातारा जिल्ह्यामध्ये असणाऱ्या वीरमाडे गावी श्रावण महिना व्रतानिमित्त गेल्यानंतर अचानक निधन झाल्यामुळे त्यांना धावडशी या गावी समाधी देण्यात आली. तर श्रीक्षेत्र भुलेश्वर येथे त्यांच्या समाधी मंदिरामध्ये त्यावेळी त्यांनी भगवान प्रभू श्रीरामचंद्र यांच्या मूर्तीची स्थापना केली होती तेव्हापासून आजपर्यंत या ठिकाणी येथील पुजारी मंडळाच्या वतीने नित्यनैमित्तिक पूजा केली जाते; मात्र आयोध्येतील आजच्या सोहळ्याप्रसंगी येथेही अंनोदोत्सव साजरा केला. तर माळशिरस गावामध्ये पेढे वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला.