भाडेकरार ऑनलाईन केल्यास; पोलीस व्हेरिफिकेशन नको
असोसिएशन ऑफ रिअल इस्टेट एजंटची पोलीस आयुक्तांकडे मागणी
प्रभात वृत्तसेवा
पुणे, दि. 4 – नवीन बदलानुसार भाडेकरार ऑनलाइन रजिस्टर झाल्यावर वेगळ्या पोलीस व्हेरिफिकेशनची गरज नाही. यामुळे ही बाब आरटीओ प्रशासन आणी सोसायट्यांना पोलिसांनी पत्र देऊन कळवावी, अशी मागणी असोसिएशन ऑफ रिअल इस्टेट एजंटच्या वतीने पोलीस आयुक्त डॉ. के.व्यंकटेशम यांच्याकडे करण्यात आली आहे.
असोसिएशन ऑफ रिअल इस्टेट एजंटच्या वतीने पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम यांची आयुक्त कार्यालयात भेट घेण्यात आली. भाडेकराच्या टेन्ट इन्फॉर्मेशन संदर्भातील अडीअडचणी ह्या विषयात आयुक्तांना पत्र देण्यात आले. त्यांनी यासंदर्भात सर्वसामान्य नागरिकांना येणाऱ्या अडचणी व्यवस्थित समजून घेतल्या. यानंतर त्वरित आपल्या कनिष्ठांना आदेश देऊन आरटीओ आणि सोसायट्यांसाठी परिपत्रक बनवून त्याची पीडीएफ असोसिएशनच्या नावाने पाठवावी असे आदेश दिले.
चर्चेदरम्यान पोलीस आयुक्तांनी प्रॉपर्टी मार्केट मार्केटमध्ये मूव्हमेंट आहे का? आदी सर्व परिस्थिती विचारपूस केली. 2013 पासून वेबसाईटमध्ये बदल न झाल्याचे सांगितल्यावर त्यांनी त्वरित साइटवर करेक्शन करून त्वरित नवीन आदेश पारित करण्याची सूचना केली. नागरिकांना पोलीस टेनंट इन्फॉर्मेशनसाठी व्हेरिफिकेशनसाठी पोलीस चौकीत चक्कर मारायला लागू नये हा विषय पुण्याची सूत्रे हातात घेतली तेव्हाच ठरवले होते, असे आयुक्तांनी स्पष्ट केले.
लिव्ह ऍण्ड लायसंन्स करार ऑन लाइन रजिस्टर झाला म्हणजेच पोलीस व्हेरिफिकेशन पूर्ण झाले. ह्या नुकत्याच झालेल्या बदलाची माहिती आरटीओ कार्यालयाला पोलीस खात्याकडून कळवावी अशी मागणी असोसिएशनने केली आहे. तसेच 2013 पासून सर्व सोसायट्यांना पोलीस व्हेरिफिकेशन पूर्ण झाले की नाही हे तपासण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. यामुळे पोलीस व्हेरिफिकेशनशिवाय घरसामानाची गाडी सोसायटीत सोडली जात नाही. त्यांनासुद्धा भाडेकरात ऑनलाइन रजिस्टर झाल्यावर वेगळ्या व्हेरिफिकेशनची गरज नसल्याचे आदेश देण्यात यावेत, अशीही मागणी करण्यात आली.
शिष्टमंडळात असोसिएशनचे अध्यक्ष सचिन शिंगवी, सचिव राजेंद्र दोशी, कैलास फोफालिया ऍड हरिश खर्डेकर सहभागी होते.