- व्यावसायिक आर्थिक विवंचनेत
चिंचवड – करोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने सलून, ब्यूटी पार्लर यांच्यावर बंदी घातली होती. परंतु काही दिवसांपूर्वी काही नियम व अटीच्या शर्थीवर त्यांना व्यवसाय सुरू करण्यास परवानगी दिली आहे. परंतु ब्यूटी पार्लरकडे मात्र महिलांनी पाठ फिरवल्याने व्यावसायिक मोठ्या आर्थिक अडचणीत सापडल्या आहेत. त्यामुळे त्यांच्यावर अक्षरशः उपासमारीची वेळ आली आहे.
पिंपरी-चिंचवड शहरात सुमारे 400 ब्यूटी पार्लर चालिका आहेत. या व्यवसायावर अवलंबून असणाऱ्या इतर महिला कर्मचारी अशा साधारण दीड हजारांपेक्षा अधिकांवर उपासमारीची वेळ आली आहे. बऱ्याच कुटुंबीयांचा रोजीरोटीचा मूळ आधार ब्यूटी पार्लर होता. त्यामुळे या व्यावसायिकांना मोठ्या आर्थिक विवंचनेचा सामना करावा लागत आहे. बहुसंख्य महिलांनी करोनाच्या वाढत्या संख्येमुळे ब्यूटी पार्लरमध्ये जाण्याचे टाळले आहे. त्यामुळे घरगुती ब्यूटी पार्लर अथवा गाळा घेऊन ज्यांनी ब्यूटी पार्लर सुरू केले आहे त्यांच्यावर मोठी आर्थिक कुऱ्हाड कोसळली आहे.
गेल्या सहा महिन्यांपासून शहरातील अल्पशिक्षित, उच्च शिक्षित, गृहिणी, नोकरदार, महिला, तरुणींनी घरातच तर काहींनी भाड्याने गाळा घेऊन किंवा कर्ज काढून व्यवसायासाठीच अत्यावश्यक सामग्री घेतली होती. सहा महिन्यांपासून व्यवसायच ठप्प झाल्यामुळे अनेक पार्लरचालक व त्यांच्यावर अवलंबून असणारे त्यांचे कुटुंबीय अडचणीत आले आहे. काही ठिकाणी भाड्याचा गाळा घेतलेले मालकाला भाडे न दिल्यामुळे त्याच्याकडून गाळे खाली करून घेतले. तर बॅंकादेखील कर्जाचे हप्ते भरण्याचा तगादा लावत आहे. त्यामुळे पार्लरचालक चांगलेच अडचणीत सापडले आहेत.
लॉकडाऊनपूर्वी होती चांगली कमाई
लॉकडाऊनपूर्वी पार्लर व्यावसायिकांचा व्यवसाय चांगला जोरदार सुरू होता. लग्नाचे वधू-वराचे मेकअप, मेहंदी काढण्यासाठी सात हजारांहून अधिकची कमाई होत होती. आता करोनामुळे महिलावर्गाने ब्यूटी पार्लरकडे पाठ फिरवल्याने हा व्यवसाय करणे कठीण झाले आहे.
ब्यूटी पार्लर क्षेत्रातील व्यावसायिक महिला असंघटित आहेत. त्यामुळे त्यांना संघटित करणे सध्या कठीण होत आहे. संघटना मजबूत नसल्याने सर्वांपर्यंत पोहचणे अवघड जात आहे. अशा असंघटित व्यावसायिकांवर अवलंबून असणाऱ्या इतर घटकांचा विचार करून शासनाने, महापालिकेतील संबंधितांनी त्यांना आर्थिक मदत करणे गरजेचे आहे.
– पौर्णिमा अगरवाल, पार्लर युनिट अध्यक्षा, पिंपरी-चिंचवड