लोणी काळभोर -उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल उपविभागीय पोलीस अधिकारी, हवेली उपविभाग, हवेली पुणे ग्रामीण कार्यालयाअंतर्गत पोलीस ठाण्यातील चार कर्मचाऱ्यांना पोलीस मॅन ऑफ द मंथ म्हणून रोख रक्कम व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
हवेलीच्या उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सई भोरे पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस ठाण्यामध्ये उत्कृष्ट काम करणाऱ्या पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेल्या कामाचे वेळेवर कौतूक होत नाही. त्यांना प्रोत्साहन मिळत नाही.
त्याचा परिणाम त्यांच्या दैनंदिन कामकाजावर होऊन उदासिनता निर्माण होते. ही बाब जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख यांच्या निर्दशनास आल्यानंतर त्यांनी जिल्हा, उपविभागीय स्तरावर व इतर शाखेत अधिकारी व पोलीस अंमलदार यांना बक्षीस योजना जाहीर केली.
त्यानुसार हवेली उपविभागातील प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये क्राईम, मुद्देमाल, सिसीटीएनएस, गोपनीय आदी बाबींमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणारे पोलीस ठाणेनिहाय एक पोलीस अंमलदार यांना “पोलीस मॅन ऑफ द मंथ’ म्हणून रोख रक्कम व प्रमाणपत्राने गौरव करण्यात येईल, अशी सूचना दिली आहे.
हवेली विभागातील पोलीस ठाण्यातील लोणी काळभोर पोलीस ठाण्यातील रोहिदास पारखे, लोणीकंद पोलीस ठाण्यातील हवालदार संतोष कुलथे, पोलीस शिपाई सूरज वळेकर, पौड पोलीस ठाण्यातील रॉकी देवकाते यांचा सन्मान उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सई भोरे-पाटील यांच्या हस्ते करण्यात
आला आहे.