तळेगाव दाभाडे शहरात आरोग्य सुविधेबाबत खबरदारी
तळेगाव स्टेशन – “करोना’ विषाणूचा वाढता संसर्ग आणि प्रादुर्भाव रोखण्यासाठी तळेगाव दाभाडे नगरपरिषद व प्राथमिक आरोग्य केंद्र आणि तळेगाव दाभाडे पोलिसांचे युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. परदेशवारी करणाऱ्या एकूण 47 जणांना होम क्वारंटाइन करण्यात आले होते. त्यापैकी 24 जणांची 14 दिवसांनंतरची “करोना चाचणी निगेटिव्ह’ आली आहे. लिंब फाटा ते तळेगाव स्टेशन चौक हा मुख्य रस्ता वाहतुकीसाठी “वन वे’ करण्यात आला आहे.
शहरातील नागरिकांच्या आरोग्याला बाधा येऊ नये म्हणून नगरपरिषदेचा आरोग्य विभाग सतर्क झाला आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर नगरपरिषदेच्या वतीने नवनवीन संकल्पना राबविण्यात येत आहे. त्यात त्यांना चांगले यश आल्याचे दिसून येत आहे. तळेगाव शहरात करोनाचा एकही “पॉझिटिव्ह’ रुग्ण नाही. करोनाबाबत कोणीही अफवा पसरवू नये, असे आवाहन नगरपरिषद प्रशासनाने केले आहे.
महामार्गापासून मारुती मंदिर, जिजामाता चौक ते स्टेशन चौक या मुख्य रस्त्यावर प्रायोगिक तत्त्वावर एकेरी वाहतूक सुरू करण्यात आली आहे. स्टेशनवरून गावात येण्यासाठी स्टेशन चौक, चाकण रोडमार्गे, तळेगाव फाटा व तेथून महामार्गाने लिंब फाटा येथे आल्यानंतर तेथून गावात जावे लागत आहे.
परराज्य व परदेशगमन केलेल्या नागरिकांचा सर्व्हे करण्यात येत आहे. नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन मुख्याधिकारी दीपक झिंजाड यांनी केले आहे.
करोनाच्या पार्श्वभूमीवर तळेगाव शहरात 13 मार्चपासून “होम क्वारंटाइन’ला सुरुवात झाली. आजपर्यंत तळेगाव शहरातील एकूण 47 नागरिकांचे “होम क्वारंटाइन’ करण्यात आले. त्यांच्यावर डॉक्टरांच्या पथकांची देखरेख आहे. विलगीकरणात देखरेखीखाली असलेल्यापैकी कोणीही “पॉझिटिव्ह’ नाही.
“होम क्वारंटाइन’ असलेल्यांपैकी 14 व्या दिवशी नागरिकांची तपासणी केली असता आजपर्यंत 24 नागरिकांचे आरोग्य उत्तम असल्याची माहिती तळेगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे प्रमुख डॉ. प्रवीण कानडे यांनी दिली. त्यांना कोणताही आजार नसल्याचे सांगण्यात आले. तळेगाव स्टेशन आणि गाव भागात जंतुनाशकांची फवारणी करण्यात आली आहे.
तळेगाव स्टेशन विभागातील प्रमुख चौक आणि रस्त्यांसह गाव भागातील रस्ते प्रेशरच्या पाण्याने धुवून काढण्यात आले आहेत. प्रमुख रस्ते अग्निशमन बंबामधील पाण्यात जंतुनाशके टाकून त्यांची सर्व ठिकाणी फवारणी करण्यात आली. तसेच विविध कॉलनी भागातही जंतुनाशक पावडर टाकून धुरळणी करण्यात आली. नगरपरिषदेतील अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी कामावर आहेत. अन्य कर्मचाऱ्यांमधून गरजेपुरते कर्मचारी ठेवून बाकी कर्मचाऱ्यांना सुट्टी देण्यात आली आहे.
नागरिकांनी घरातच थांबावे, आपली व आपल्या कुटुंबाची काळजी घ्यावी, अत्यावश्यक कारणाशिवाय घराबाहेर पडू नये, प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन मुख्याधिकारी दीपक झिंजाड आणि प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ. प्रवीण कानडे यांनी केले आहे.