जाणून घ्या कर्तृत्व आणि दातृत्वाचे प्रतीक असलेल्या ‘अझीम प्रेमजीं’बाबत

देशावरील कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर एकीकडे सरकारतर्फे युद्ध पातळीवर प्रयत्न सुरु असतानाच दुसरीकडे देशातील श्रीमंत वर्गाकडून देखील मोठ्या प्रमाणात मदत जाहीर केली जातीये. अशातच आज देशातील नामांकित उद्योगपती असलेल्या अझीम प्रेमजी यांनी देशाला कोरोनाविरोधात लढण्यासाठी ११२५ कोटींचे आर्थिक पाठबळ देणार असल्याची घोषणा केलीये. यानिमित्ताने अझीम प्रेमजी यांचा जीवन प्रवास मांडणारा एक लेख दैनिक प्रभातच्या भांडारातून

भारत हा श्रीमंतांचा गरीब देश आहे असे म्हटले जाते. जगभरातील अब्जाधीशांच्या यादीमध्ये भारताचे स्थान पहिल्या पाचात आहे. समकालीन स्थितीमध्ये श्रीमंत अधिक श्रीमंत तर गरीब अधिक गरीब होताना दिसत आहे. ही दरी दिवसेंदिवस वाढतच आहे. अशामध्ये काही माणसे अधिक श्रीमंत असूनही त्यांनी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी आपले असणे विसरत, करोडो रूपयांचे दान केलेलं आहे. यामध्ये प्रामुख्याने बिल गेट्‌स आणि वारेन बफे यांची नावे अग्रक्रमाने घेतली जातात. यात आता एका भारतीय नावाची भर पडली आहे. ते नाव म्हणजे विप्रो या जगप्रसिद्ध उद्योगसमूहाचे सर्वेसर्वा अझीम प्रेमजी.

अझीम प्रेमजी यांचा जन्म 24 जुलै 1945 मध्ये झाला. घरची परिस्थिती साधारण होती. आपल्या पारंपरिक व्यवसायात न रमता त्यांनी शिकण्यासाठी स्टॅनफर्ड विद्यापीठात विद्युत अभियांत्रिकी या शाखेत प्रवेश घेतला. शिकत असताना वडिलांचे अकस्मात निधन झाल्यामुळे त्यांना भारतात परत यावे लागले. व्यवसायाची संपूर्ण जबाबदारी त्यांच्यावर पडली. वयाच्या एकविसाव्या वर्षी त्यांनी विप्रोची सूत्रे आपल्या हातात घेतली. व्यवसायाचा कसलाही अनुभव पाठीशी नसताना त्यांनी विप्रोमध्ये वेगवेगळे प्रयोग करीत, आपली एक वेगळी ओळख निर्माण केली. विप्रो हा पूर्वी साबण, मीठ, तेल आणि भाजीपाला विकणारा उद्योगसमूह होता.

आपली असलेली एक विशिष्ट ओळख बदलत अझीम प्रेमजी यांची विप्रो आज असंख्य क्षेत्रांमध्ये काम करीत आहे. ज्यामध्ये माहिती व तंत्रज्ञान, आरोग्य, शिक्षण, शेती, सेवा अशा असंख्य बाबींचा त्यात समावेश होतो. सातत्यपूर्ण दर्जा जपत ग्राहकांच्या समाधानाला महत्व देत विप्रोने आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. विप्रोचे आज जगभरातील सत्तर पेक्षा अधिक देशांमध्ये काम चालू आहे.

माणुसकी जपत अझीम प्रेमजी यांनी 2001 मध्ये अझीम प्रेमजी फाउंडेशन या संस्थेची स्थापना केली. या संस्थेच्या माध्यमातून ते आपली सामाजिक बांधिलकी जपत भरीव आणि सकारात्मक कार्य करीत आहेत. शिक्षण क्षेत्रामध्ये त्यांनी विशेष काम केले आहे. ज्या माध्यमातून लाखो विद्यार्थ्यांची शिक्षणाशी नाळ जोडली गेली आहे. आताच त्यांनी 52750 कोटी रूपयांचे दान केले. यामुळे ते आशिया खंडातील सर्वाधिक दान करणारी व्यक्ती ठरले आहेत. बिल गेट्‌स आणि वारेन बफे यांच्यानंतर सर्वाधिक दान करणारे ते जगातील तिसरे व्यक्ती ठरले आहेत. या प्रेमजी यांच्या दातृत्वाबद्दल बिल गेट्‌स म्हणाले की, प्रेमजी सातत्यपूर्ण करीत असलेल्या लोककल्याणकारी कार्यातून मला प्रेरणा मिळते. प्रेमजी यांनी आता केलेल्या दानासह त्यांनी आजपर्यंत 1.45 लाख कोटी रुपये दाननिधी समाजाच्या भल्यासाठी दिला आहे.

महात्मा गांधी आणि आपल्या आईला ते प्रेरणास्त्रोत मानतात. टाईम नियतकालिकाने जगभरातील शंभर प्रभावशाली व्यक्तींमध्ये त्यांची निवड केलेली आहे. तसेच त्यांच्या सामाजिक योगदानाची दखल घेऊन भारत सरकारने त्यांना पद्मभूषण आणि पद्मविभूषण या नागरी सन्मानाने सन्मानित केलेले आहे. अझीम प्रेमजी विद्यापीठाच्या मार्फत दर्जात्मक शिक्षणावर त्यांनी भर दिला आहे. समाजहितैषी भूमिका घेऊन देशातील अनेक उद्योगसमूह आपली सामाजिक बांधिलकी जपत आहेत. आपल्या मालकीचे भागभांडवल सामाजिक कार्यासाठी देणारे अझीम प्रेमजी प्रसिद्धीलोलुप जगापासून दूर राहात आपले दातृत्व जपत आहेत. त्यांच्या जनहितार्थ कार्यापासून प्रेरणा घेऊन आपणही आपली सामाजिक बांधिलकी जपावी.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.