कुरवली परिसरात पोलीसांच्या दक्षतेत वाहतूक सुरू
कुरवली- इंदापूर तालुक्यातील पश्चिम भागातील निरा नदीला पूर आल्याने तावशी, जांब, कुरवली, चिखली येथील बंधारे पाण्याखाली गेले आहेत. निरा नदीच्या पुराच्या पाणी फुगवटामुळे तावशी व चिखलीचा ओढ्यावरील रस्त्यावरून वाहतूक बंद करण्यात आली आहे. कुरवली-कुरुभावी व कळंब-कळंबोली पुलावरून पाणी वाहत असल्याने पुणे आणि सोलापूर जिल्हा प्रशासनाने खबरदारी घेत पोलीस, महसूल व सार्वजनिक बांधकाम विभागाचे कर्मचारी तैनात केले आहेत.
नदी लगतच्या गावांना दक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. स्थानिक पोलीस स्टेशन, पोलीस पाटील, सार्वजनिक बांधकाम विभाग, महसूल विभाग यांनी खबरदारी घेत पुलावरून जाणाऱ्या वाहतुकीस मज्जाव केला आहे. निरा नदीच्या पुराचे पाणी सखल भागात आल्याने जांब, कुरवली, चिखली गावाच्या नदीलगतच्या घराजवळ पाणी साचले आहे. तसेच नदी जवळपासच्या शेतात पाणी जमा झाले आहे.
पुणे व सोलापूर जिल्ह्यातील प्रशासनाने दक्षता घेऊन पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे. वालचंदनगर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार रोहिदास चौधर, पोलीस नाईक रमेश शिंदे, पोलीस शिपाई प्रवीण वायसे, पोलीस पाटील विलास कणसे, पोलीस मित्र सचिन लवटे तसेच बांधकाम विभागाचे अभियंता दिपक पवार महसूल विभागाचे तलाठी पी. एस. भगत, कोतवाल अनिल गायकवाड यांनी नदी पुलावर नागरिकांना वाहतुकीच्या सूचना देऊन बॅरीकेटस लावले.