पुणे : कोरोना आपत्तीमुळे धनसंपदेपेक्षा शरिरसंपदा महत्त्वाची आहे हे अधोरेखित झाले आहे. सुसज्ज व्यायामशाळा ही आज गरज निर्माण झाली असून, पुरूषांबरोबरच महिलांनाही व्यायामशाळा उपलब्ध करून देण्याची गरज असल्याचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केली. राष्ट्रीय युवा दिनाचे औचित्य साधून पुणे महापालिका व युवा स्वराज्य प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने उभारण्यात आलेल्या पेहेलवान जीमचे उद्घाटन पाटील यांच्याहस्ते करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते. यावेळी खासदार गिरीष बापट, स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने, संघटक सरचिटणीस राजेश पांडे, वनराईचे अध्यक्ष रविंद्र धारिया, कोथरूड विधानसभा मतदार संघाचे अध्यक्ष पुनित जोशी, पेहेलवान जीमचे संचालक सागर धारिया, पेहेलवान जीमची संकल्पना मांडणारे नगरसेवक दीपक पोट यावेळी उपस्थित होते.
पाटील म्हणाले, नगरसेवकांनी आपण एका प्रभागाचे नगरसेवक आहोत ही भावना न ठेवता, संपूर्ण शहराचे व्हिजन डोळ्यासमोर ठेऊन काम केले पाहिजे. रस्ते, गटर यात न अडकता शहराची काय आवश्यकता आहे ती पूर्ण करणे ही नगरसेवकांकडून नागरिकांची अपेक्षा असते ती पूर्ण करण्यासाठी नगरसेवकांनी प्रयत्न करावेत, एका प्रभागातील चार नगरसेवक एकत्र आल्यावर किती चांगले काम होते याचे उत्तम उदाहरण या पेहेलवान जीमच्या माध्यमातून व पोटे यांच्या प्रभागातून दिसून येत असल्याचे खासदार बापट यांनी सांगितले.
तर कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात नगरसेवक दीपक पोटे यांनी पेहेलवान जीम मागील संकल्पना व उद्देश स्पष्ट केला तसेच ही जीम प्रति दिन दहा रूपये शुल्काने उपलब्ध होणार असल्याचे सांगितले.