हर्षवर्धन पाटील यांची माहिती
रेडा- इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या येथील कला विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयात युजीसी मान्यताप्राप्त पदवी व्होकेशनल कोर्सेस सुरू करण्यात आल्याची माहिती माजी सहकारमंत्री, संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांनी दिली.
शैक्षणिक वर्ष 2019- 20 करिता विद्यापीठ अनुदान आयोग, नवी दिल्लीने राष्ट्रीय व्यावसायिक शिक्षण पात्रता संरचनेअंतर्गत रोजगार, पदवीधर आणि उद्योजक निर्माण करण्यासाठी इंदापूर महाविद्यालयातील फिश फार्मिंग प्रोसेसिंग ऍण्ड मॅनेजमेंट, डेअरी टेक्नॉलॉजी, बॅंकिंग ऍन्ड फायनान्स, रिटेल मॅनेजमेंट, फुड सायन्स ऍन्ड पोस्ट हार्वेस्टिंग टेक्नॉलॉजी, ऍरोमॅटिक प्लॅन्ट नर्सरी मॅनेजमेंट या नवीन सहा कोर्सेसला मान्यता दिली आहे. प्रत्येक कोर्सेससाठी 50 जागा उपलब्ध असणार आहेत. 3 वर्षांचा पदवी कोर्स पूर्ण झाल्यानंतर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची व्होकेशनल पदवी प्रमाणपत्र विद्यार्थ्यांना मिळणार आहे.
पाटील म्हणाले की, तंत्रज्ञानाच्या युगामध्ये व्यावसायिक शिक्षणाला महत्त्व आहे. या दृष्टीने इंदापूर महाविद्यालयात नव्याने व्होकेशनल कोर्सेस सुरू करण्यात आले. युवक रोजगारभिमुख होवून नवीन उद्योगाच्या उभारणीमध्ये सक्रिय झाला पाहिजे. दरम्यान, विद्यार्थ्यांच्या करियरसाठी या कोर्सेसला महत्त्व असून तज्ज्ञ व्यक्तींचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिले जाणार आहे, असे आवाहन संस्थेचे सचिव मुकुंद शहा आणि प्राचार्य डॉ. संजय चाकणे यांनी केले.