वयाच्या 58 व्या वर्षीही बजावले जवानाचे कर्तव्यच
पुणे : शासकीय सेवेतून निवृत्त होण्यासाठी वर्षभराचा कालावधी शिल्लक राहताना, शासकीय कर्मचाऱ्यांकडून कामाकडे दूर्लक्ष केले जात असल्याचे अनेकदा पहायला मिळते. मात्र, अग्निशमनदलात चालक म्हणून सेवा निवृत्त होण्यासाठी अवघे तीन महिने राहिले असतानाही, घरा शेजारी लागलेल्या आगीच्या दुर्घटनेत स्वत:च्या जीवाची पर्वा न करता या आगीशी दोन हात करत आग नियंत्रणात आणून मोठी दुर्घटना टाळत महापालिकेच्या अग्निशमनदलाच्या वाहनावर चालक असलेल्या बंडेराव गणपती पाटील(वय 58 ) यांनी कर्तव्याप्रती अग्निशमनदलाच्या जवानाची आपल्या कर्तव्याशी असलेली बांधिलकी दाखवून दिली आहे.
पुणे अग्निशमन दलाच्या मुख्यालयात वाहन चालक म्हणून काम करणारे बंडेराव गणपती पाटील(वय 58 ) हे काल सकाळी ड्युटी करून ते पिंपळे गुरव येथे घरी असताना सायंकाळी त्यांच्या शेजारी असणाऱ्या घरामध्ये आग लागून गृहपयोगी काही साहित्य व फ्रिज जळाले. ही घटना घडत असताना नागरिकांनी आरडाओरडा केल्यावर पाटील यांनी त्या घराकडे तातडीने धाव घेतली व एक स्थानिक युवक योगेश पाटील यांच्या मदतीने तेथील पाण्याचा वापर करत आग आटोक्यात आणली . यामध्ये घराचे नुकसान झाले तरी पाटील यांच्या तत्परतेने पुढील अनर्थ टळला. नंतर रहाटणी अग्निशमन दलाचे जवान ही घटनास्थळी दाखल झाले होते.
पाटील यांनी केलेल्या कामाचे स्थानिकांनी कौतुक केले. अग्निशमन वाहन चालक बंडेराव पाटील हे भारतीय सैन्य दलातून निवृत्त असून अग्निशमन दलात कर्तव्य बजावत आहेत. आयुष्यभर देशाची सेवा करुन ते वयोपरत्वे वयाच्या 58 व्या वर्षी येत्या मे महिन्यात अग्निशमन दलातून ही निवृत्त होत आहेत. मात्र, त्यांच्या या साहसाने अग्निशमनदलात सेवेसाठी येणाऱ्या नवीन पिढीला एक आदर्श निर्माण करून दिला आहे.