सोयाबीन बहरला, खुरपणीऐवजी कोळपणीला प्राधान्य

चिंबळी -पावसाच्या आशेवर पेरलेला सोयाबीन कमी पावसात देखील बहरला असून तण वाढल्याने शेतकऱ्यांची सध्या खुरपणीची लगबग सुरू आहे. खुरपणीसाठी मजूर मिळत नसल्याने शेतकरी कोळपणीला प्राधान्य देताना दिसून येत आहेत.
कुरूळी परिसरात मजूर टंचाई जाणवत असल्याने शेतीचे कामे रखडली आहेत. शेतकऱ्यांना मजुरांअभावी पर्यायाने पिकावर तणनाशक फवारणी करावी लागत आहे. चिंबळी (ता. खेड) परिसरात मोठ्या प्रमाणात औद्योगिकीकरण झाल्याने येथील मजुरांना कायमस्वरूपी रोजगार उपलब्ध होतो. त्यामुळे अनेकांनी शेतीतील कामे करण्याकडे पाठ फिरवली आहे.

येथील काही प्रगतशील शेतकरी आजही शेती करत असून त्यांना या मजूर टंचाईला सामोरे जावे लागत आहे. यावर उपाय म्हणून शेतकऱ्यांनी पिकांतर्गत वाढलेले तण नष्ट करण्यासाठी औषध फवारणी सुरु केली आहे. याद्वारे मजूर टंचाईला पर्याय शोधला आहे. मजुरांना कंपनीमध्ये कायम स्वरूपी रोजगारा बरोबरच इतर सुविधा आणि वेतन शेत मजुरीच्या तुलनेने जास्त असते. म्हणून त्यांचाही कल शेतमजुरीपेक्षा कंपनीतील कामाकडे असलेला दिसून येतो.

लांबलेला पाऊस आणि वातावरणातील बदलांमुळे अगोदरच शेत पिकांचे होणारे नुकसान सोसणाऱ्या शेतकऱ्यांना या कृत्रिम मजूर टंचाईमुळे अस्मानी संकटाबरोबरच सुलतानी संकटांचा सामना करावा लागत असल्याचे चित्र आहे. गेल्या आठवडाभरापासून मुसळधार पावसाने जोरदार हजेरी लावली असल्याने चिंबळी, कुरूळी, मोई, निघोजे, केळगाव, माजगाव, परिसरातील खरीप हंगामातील सोयाबीन व भुईमूग पिकाची खुरपणी व खोळपणीची कामे पुन्हा ठप्प झाली असून पाऊस कधी थांबेल? असा प्रश्न शेतकरी वर्गानी उपस्थित केला आहे. जोरदार पडत असलेल्या मुसळधार पावसाने सगळीकडे शेतात व रस्त्यावर पाणीच पाणी साचले आहे. तर इंद्रायणी नदी गेल्या तुडुंब भरुन वाहत असल्याने या परिसरातील शेतीसाठी व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला असल्याने शेतकरी वर्गानी समाधान व्यक्त केले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.