विद्यार्थी दशेतच कायद्याचे ज्ञान अपेक्षित

पोलीस निरीक्षक उमेश हजारे; स्टुडंट पोलीस कॅडेटचा शुभारंभ

सातारा, दि. 27 (प्रतिनिधी)-

आजचे विद्यार्थी हेच भविष्यातील नागरिक असल्याने विद्यार्थी दशेतच त्यांना कायद्याचे ज्ञान अवगत होणे अपेक्षित असल्याचे मत सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक उमेश हजारे यांनी केले. ते केंद्र व राज्य सरकारच्या स्टुडंट पोलीस कॅडेट या उपक्रमाच्या शुभारंभप्रसंगी बोलत होते. गुरूवारी येथील महाराजा सयाजीराव विद्यालयातील विद्यार्थ्यांना ते मार्गदर्शन करत होते. यावेळी सहाय्यक क्रीडा अधिकारी कोळी, विद्यालयाचे मुख्याध्यापक जाधव यांच्यासह मान्यवर व विद्यार्थी उपस्थित होते.

विद्यार्थ्यांना अंतर्गत व बाह्यवर्ग प्रशिक्षणासोबत पोलीस दलाविषयी माहिती, कायदेविषयक माहिती, संविधानिक तत्वे, समुदाय पोलीस, राष्ट्रीय चळवळ, व्यक्तिमत्व विकास, नितीमत्ता विषयक माहिती, विद्यार्थ्यांचा आत्मविश्‍वास वाढवण्यासोबतच त्यांना शिस्त लावणे या उद्देशाने केंद्र व राज्य सरकारने देशभरातील इयत्ता आठवी व नववीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी “पोलीस स्टुडंट कॅडेट’ या उपक्रमाची सुरूवात केली आहे.

त्या उपक्रमाअंतर्गत सातारा जिल्ह्यात एकूण पाच विद्यालयांची निवड करण्यात आली आहे. निवड झालेल्या विद्यालयापैकी महाराजा सयाजी विद्यालयात गुरूवारी पोलीस निरीक्षक हजारे मार्गदर्शन करत होते.

विद्यार्थ्यांना शिस्त लावण्यासाठी, त्यांच्या जबाबदाऱ्या पुर्ण करण्यासाठी आवश्‍यक असणारी क्षमता वाढवण्यासाठी पोलीस मुख्यालयातील कवायत निर्देशक विद्यार्थ्यांना कवायत, परेड, क्रॉस कंट्री मार्च, योग याचे प्रशिक्षण दिले जाईल असेही हजारे यांनी सांगितले. कार्यक्रमाची प्रास्तावना व आभार सहाय्यक पोलीस निरीक्षक माधुरी जाधव यांनी केले.

Leave A Reply

Your email address will not be published.