विज्ञानविश्‍व: चंद्रावरची लायब्ररी

डॉ. मेघश्री दळवी

अपोलो यानातून माणूस चंद्रावर उतरला, त्याचा या वर्षी सुवर्णमहोत्सव. हीच संधी साधत या वर्षी भरपूर चांद्रमोहिमा यशस्वी होत आहेत. त्या वेगवेगळ्या देशांच्या आहेत हे विशेष. वर्षाच्या सुरुवातीला चीनचं चांगं-4 हे यान चंद्रावर उतरलं. आपल्या चांद्रयान-2 चं उड्डाणही याच वर्षी होणार आहे, तर मून एक्‍सप्रेस ही खासगी अमेरिकन कंपनी सप्टेंबरमध्ये चंद्रावर जाणार आहे.

इस्राएलचं खासगी यान बेरशीट या मालिकेतलं विशेष म्हणावं लागेल. गूगलच्या लूनार एक्‍स-प्राइज या अभिनव स्पर्धेसाठी त्याची 2011 पासून तयारी सुरू होती. गूगलच्या या स्पर्धेसाठी 31 मार्च 2018 च्या आत उड्डाण करणं आवश्‍यक होतं. अखेरच्या टप्प्यात उरलेल्या पाचपैकी कोणत्याही प्रकल्पाला ते शक्‍य झालं नाही. इतर प्रकल्प बारगळले तरी त्यातल्या बेरशीटच्या मागे काही खासगी इस्राएली गुंतवणूकदार उभे राहिले आणि ही मोहीम पुढे सुरू राहिली.

स्पेस-एक्‍सचं रॉकेट वापरून बेरशीट फेब्रुवारीत निघालं, ते 11 एप्रिलला चंद्रावर उतरणार होतं. मात्र लॅंडींग करताना अखेरच्या क्षणी ते जोराने आदळलं. लॅंडींग नीट न झाल्याने त्याचे तुकडे झाले आणि त्यात नष्ट झाली चंद्रावरची पहिलीवहिली लायब्ररी.

ही लायब्ररी होती डिजिटल, केवळ डिस्कच्या स्वरूपात. या डिस्कमध्ये तीन कोटींहून अधिक पानं होती. दोनशे गिगाबाइटचा संपूर्ण विकिपीडिया होता. सोबत सुमारे पाच हजार भाषांची माहिती आणि भाषांची नीट कल्पना यावी यासाठी भाषांतराचे दीड अब्ज नमुने होते. यान इस्राएलचं असल्याने त्यांच्या संस्कृतीचा तपशील, काही गाणी, आणि चित्रांचा समावेश होता.

चंद्रावर वातावरण नाही, त्यामुळे वैश्विक किरणांचा प्रचंड मारा तिथे सतत होत असतो. लहानमोठ्या अशनीही आदळत असतात. त्यातूनही ही लायब्ररी टिकून राहवी याची पुरेपूर काळजी घेतलेली होती. सहा अब्ज वर्षे ती टिकेल अशी योजना केलेली होती; पण लॅंडींगच नीट न झाल्याने ती वाचली नाही. इस्राएलने हार न मानता बेरशीट-2 या नव्या प्रकल्पाची घोषणा नुकतीच केली. बेरशीट-2 मध्ये या लायब्ररीची पुढची आवृत्ती चंद्रावर पाठवण्यात येणार आहे. या लायब्ररीला इतकं महत्त्व का? त्याला पैलू आहे चांद्रवसाहतींचा. आज ना उद्या चंद्रावर माणसांची वसाहत होईल हे नक्की. त्यासाठी आवश्‍यक त्या सुविधा विकसित करण्यासाठी नासा आणि इतर संस्था पुढाकार घेत आहेत. तेव्हा तिथे आपल्या देशाची वसाहत उभी करणे, संशोधन केंद्र स्थापन करणे हे सर्वांना गरजेचं वाटू लागलं आहे. पृथ्वीवर ग्लोबल वॉर्मिंगचे धोके स्पष्ट दिसत आहेत. इतर अरिष्टदेखील येऊ शकतात. अशा वेळी दुसरा एखादा आसरा असणं उपयुक्त होईल.

याच दृष्टीने ही लायब्ररी चंद्रावर न्यायची आहे. भविष्यात पृथ्वीवरची सर्व साधनसंपत्ती संपून गेली, आपली सगळी पुस्तकं जीर्णशीर्ण होऊन नष्ट झाली, होता-नव्हता सगळा डेटा नाहीसा झाला, तरी आपलं ज्ञान टिकून राहावं ही अपेक्षा त्यामागे आहे. पुढील पिढ्या अंतराळात जन्माला येतील, निवास करतील, तरी त्यांना पूर्वजांचा ज्ञानसाठा उपलब्ध व्हावा यासाठी हा चंद्रावरच्या लायब्ररीचा खटाटोप.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.