आता पश्‍चिम महाराष्ट्रातील देवस्थानांच्या ठिकाणी “हिरकणी’ कक्ष

सह आयुक्तांच्या सूचनेला देवस्थान समित्यांकडून प्रतिसाद

पिंपरी – महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने सुरू केलेला “हिरकणी’ कक्ष यशस्वी ठरल्यानंतर आता याच धर्तीवर पश्‍चिम महाराष्ट्रातील प्रमुख देवस्थानांच्या ठिकाणी हिरकणी कक्ष उभारण्याचे आदेश सह धर्मादाय आयुक्त दिलीप देशमुख यांनी दिले आहेत. आयुक्तांच्या या आदेशाला देवस्थानानच्या प्रमुखांनीही सकारात्मक प्रतिसाद दिल्याने बहुतांश ठिकाणी “हिरकणी’ कक्ष अस्तित्त्वात आला आहे.

गर्दीच्या ठिकाणी बाळंत महिलांना आपल्या बालकांना दूध पाजण्यास अडचण येते. नेमकी हीच अडचण लक्षात घेवून राज्य परिवहन महामंडळाच्या प्रशासनाने आपल्या सर्वच्या सर्व बस स्थानकांमध्ये हिरकणी कक्ष उभारण्याचा निर्णय घेतला होता. राज्यातील बहुतांश गर्दीची ठिकाणी असलेल्या बसस्थानकांवर हिरकणी कक्षाची उभारणी करण्यात आली आहे. या कक्षामुळे मातांना आपल्या बालकास दूध पाजण्यात येणारी अडचण नाहीशी झाली. शिवाय महामंडळाच्या या योजनेचे
कौतुकही झाले होते.

पश्‍चिम महाराष्ट्रात विविध ठिकाणी प्रमुख देवस्थाने आहेत. या देवस्थानांमध्ये नेहमीच गर्दी असते. त्यामुळे मंदिरात येणाऱ्या महिलांना आपल्या बाळास स्तनपान करण्यास अडचणी येतात, ही वस्तुस्थिती आहे. ही बाब लक्षात घेवून सह धर्मादाय आयुक्त देशमुख यांनी प्रमुख आणि गर्दीच्या मंदिरांमध्ये हिरकणी कक्ष उभारण्याचे आदेश दिले होते. या आदेशाची अंमलबजाणी करण्यासाठी विविध देवस्थानच्या समित्यांनी पुढाकार घेत या कक्षाची उभारणी केली आहे. पुण्यातील श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्त मंदीर ट्रस्टमध्ये हिरकणी कक्षच्या धर्तीवर अनुसया कक्षाची उभारणी करण्यात आली आहे. त्याशिवाय पुणे पिंपरी-चिंचवडमधील प्रमुख देवस्थानांसह थेऊर, मोरगाव, सिद्धटेक, भिमाशंकर, जेजुरी व अहमदनगर येथील विठ्ठलमंदीरात या कक्षाची सुरुवात झाली आहे.

मंदिरामध्ये स्त्रियांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याने तेथे दर्शनासाठी महिलांना तासन-तास उभे रहावे लागते. त्यामुळे लहान बाळ असलेल्या मातांना आपल्या बाळांना स्तनपान करता येत नाही. यामुळे त्यांचे कशातच लक्ष लागत नाही. त्यांना चांगल्याप्रकारे आपल्या बाळाची काळजी घेता यावी तसेच दर्शनही घेता यावे या करीता या कक्षाची सुरुवात करण्यात आली आहे. जिल्ह्यातील प्रमुख देवस्थानांना याबात सूचना दिल्या असून चांगला प्रतिसाद मिळत आहे.

– दिलीप देशमुख, सह धर्मादाय आयुक्त, पुणे

देवस्थानमध्ये हिरकणी कक्ष निर्माण केले जात आहेत, ही अत्यंत महत्वाची संकल्पना आहे. यामुळे महिलांना सुरक्षित रित्या आपल्या बाळांना स्तनपान करता येईल. या बरोबरच आदेश असून सुद्धा खासगी कंपनीत महिलांसाठी अशा कक्षांची निर्मिती केली जात नाही. याकडेसुद्धा लक्ष देणे गरजेचे आहे.

– तृप्ती देसाई, भूमाता बिग्रेड संस्थापक अध्यक्ष

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.