…म्हणून पालिकेत तिसऱ्या अतिरिक्त आयुक्तांची नियुक्ती

डॉ. विपीन शर्मा एका वर्षाच्या अभ्यास दौऱ्यावर जाणार

पुणे   : राज्यशासनाकडून महापालिकेच्या रिक्त असलेल्या अतिरिक्त आयुक्तपदी नुकतीच भंडारा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी शंतनू गोयल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र, गोयल यांची नियुक्ती झाली असतानाच; फेब्रुवारी 2019 मध्ये महापालिकेत रुजू झालेले अतिरिक्त आयुक्त डॉ. विपीन शर्मा एका वर्षाच्या अभ्यास दौऱ्यावर परदेशात जाणार आहेत. त्यामुळे शासनाकडून गोयल यांची पुण्यात बदली करण्यात आल्याचे सूतेवाच करण्यात येत आहे. डॉ. शार्मा हे शासनाकडून इंग्लंड येथे अभ्यास दौऱ्यासाठी जाणार आहेत.
महापालिकेत अतिरिक्त आयुक्तपदाची तीन पदे असून त्यातील दोन पदे शासन नियुक्त तर एक पद महापालिकेच्या अधिकाऱ्यांना बढती द्यायचे आहे. मात्र, शासनाकडून या तिनही पदांवर अधिकारी नियुक्त करण्यात आले होते. मागील महिन्यातच अतिरिक्त आयुक्तपदी असलेले राजेंद्र निंबाळकर यांची एसआरएच्या प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली होती. त्यानंतर महापालिकेत पुन्हा दोन अतिरिक्त आयुक्त होते. त्यामुळे पालिकेच्या अधिकाऱ्यांकडून पुन्हा एकदा रिक्त असलेल्या पदावर पालिकेच्या अधिकाऱ्याला अतिरिक्त आयुक्त म्हणून बढती देण्याची मागणी केली जात असतनाच, शासनाने दोन दिवसांपूर्वीच गोयल यांची महापालिकेत बदली केली आहे.

त्यामुळे अतिरिक्त आयुक्तांची तीनही पदे पुन्हा कार्यरत राहतील असे चिन्ह असतानाच; डॉ शर्मा हे सप्टेंबर 2019 मध्ये एका वर्षाच्या अभ्यास दौऱ्यासाठी जाणार असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे डॉ. शर्मा परदेशात गेल्यानंतर महापालिकेत एकच अतिरिक्त आयुक्त असल्याने प्रशासकीय कामकाजावर ताण येण्याची शक्‍यता होती. ही बाब लक्षात घेऊन शासनाकडून गोयल यांची नियुक्ती करण्यात आली असल्याचे उच्च पदस्थ सुत्रांकडून सांगण्यात येत आहे. दरम्यान, डॉ. शर्मांचा दौरा त्यांच्या महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदाच्या कार्यकाळातच पकडला जाणार असून प्रशिक्षणानंतर त्यांची बदली इतरत्र होण्याची शक्‍यताही वर्तविण्यात आली आहे. या पूर्वी महापालिकेतून अशा प्रकारे प्रशिक्षणासाठी गेलेल्या अधिकाऱ्यांची शासनाकडून नंतर बदली करण्यात आल्याची अनेक उदाहरणे आहेत.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)