मंत्र्यांच्या गावात धोकादायक साइडपट्ट्या

परिंचे – पाटबंधारे राज्यमंत्री विजय शिवतारे व जिल्हा परिषदेचे सदस्य दिलीप यादव यांच्या गावातीलच रस्त्याची अवस्था धोकादायक झाली असल्यामुळे आश्‍चर्य व्यक्‍त केले जात आहे. यादववाडी (ता. पुरंदर) येथील रस्त्याच्या कडेला असलेल्या साइडपट्ट्या धोकादायक झाल्यामुळे अपघात होण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे. याकडे बांधकाम विभागाने लक्ष्य देण्याची मागणी वाहनचालकांनी केली आहे.
कोंढवा-सासवड मार्गे श्रीक्षेत्र वीर असा आठ किलो मीटर लांबीचा रस्ता 2018-19 या आर्थिक वर्षात मंजूर झाला होता. 8 किमी अंतराच्या रस्त्यासाठी 3 कोटी 65 लाख रुपये मंजूर करण्यात आले होते. यामध्ये रस्ता डांबरीकरण व मजबुतीकरणाचे काम नियोजित आराखड्यात समाविष्ट करण्यात आले होते. रस्त्याचे डांबरीकरण दोन महिन्यांपूर्वी करण्यात आले असून रस्त्याच्या कडेला असलेल्या साइडपट्ट्या तयार केलेल्या नाहीत.
यादववाडी शाळेसमोर या धोकादायक साइडपट्ट्या असून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अपघात होण्याची शक्‍यता असून या साइडपट्ट्याचे काम तातडीने पूर्ण करण्याची मागणी स्थानिक ग्रामस्थांसह परिसरातील नागरिकांनी केली आहे. परिंचे, यादववाडी या ठिकाणी रस्त्याच्याकडेला शाळा असून या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे सूचना फलक लावण्यात आले नाहीत. रस्त्यावर छोटे गतीरोधक असून देखील रस्त्यावरून गाड्या भरधाव वेगाने जात आहेत. या बाबत येथील मुख्याध्यापकांनी बांधकाम विभागाकडे तक्रार दाखल करूनही कार्यवाही होत नसल्याचे सांगितले.
राज्यमंत्री व जिल्हा परिषद सदस्य यांच्या गावातील रस्ते धोकादायक आहेत. शासनाने तीन कोटी 65 लाख रुपये खर्चूनही कामांना दर्जा राहिला नाही. बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचा अंधाधुंद कारभार आणि राज्यकर्त्यांची डोळेझाक यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे.

या रस्त्याचे काम करीत असताना साइडपट्ट्या निर्माण करण्याविषयी कोणतेही तरतूद नाही. वीर कांबळवाडी या रस्त्यावरती बोर्ड लावण्याचे काम सुरू आहे. लवकरात लवकर बोर्ड लावण्याचे काम करण्यात येईल.
दिनेश गायकवाड, शाखा अभियंता

Leave A Reply

Your email address will not be published.