भीमा नदीत खंडेरायाला शाही स्नान

दावडी – सोमवती अमावस्यानिमित्त निमगाव (ता. खेड) येथील खंडोबा मंदिर परिसरात “सदानंदाचा येळकोट येळकोट’ करीत दिवसभर भंडारा, खोबरे याची उधळण करीत भाविकांनी श्री खंडेरायाचे मनोभावे दर्शन घेतले. येथे सोमवारी (दि. 3) सुमारे 25 हजारांपेक्षा अधिक भाविकांनी दर्शन घेतले. दरम्यान, सकाळी भीमा नदीत देवाला शाही स्नान घालण्यात आला.

मे महिन्यात आलेल्या सोमवती अमावस्येनिमित्ताने सकाळी देवाला शाही आंघोळ घालण्यात आली. त्यानंतर ढोलताशे, देवाचा अश्‍व, वाजंत्रीसह मिरवणुकीद्वारे खंडेरायाची पालखी मंदिरात आणण्यात आली.श्रींची विधीवत पूजा, अभिषेक, होम, हवन केले गेले. या मिरवणुकीत ग्रामस्थ व भाविक सहभागी झाले होते. तर दिवसभर मंदिरात खोबरे व भंडाराची उधळण भाविक करीत होते. तर मंदिरात सदानंदाचा येळकोट करीत भाविकांनी मनोभावे तळी भरली. उत्तर पुणे जिल्हा व शिरूर, अहमदनगर, मावळ व शहरी भागातून भाविक दर्शनासाठी आले होते.

वर्षभर निमगाव येथे आपल्या कुलदैवताचे दर्शन घेण्यासाठी भाविक येत असतात. त्याचप्रमाणे दर रविवारी भाविकांची संख्या मोठी असते. मंदिर परिसरात खोबरे, भंडारा, देवाचे फोटो याची दुकाने थाटलेली होती. खेड तालुक्‍यातील निमगाव येथील खंडोबा हे महाराष्ट्रातील तमाम भाविकांचे कुलदैवत आहे. या खंडेरायाच्या वर्षभर विविध यात्रा भरत असतात, त्यातीलच एक महत्त्वाची म्हणजे सोमवती अमावस्या. या यात्रेमुळे शनिवार, रविवार आणि त्यात शाळेला असलेल्या उन्हाळी सुट्यांमुळे दोन दिवसांपासूनच भाविक दर्शनासाठी येत होते. दरम्यान, सोमवारी उन्हाची तीव्रता प्रचंड जाणवत असताना दुपारच्या सुमारास भाविकांच्या संख्येमध्ये तुरळकता जाणवत होती. सकाळ व सायंकाळच्या सुमारास मोठ्या संख्येने भाविक रांगेत उभे राहून दर्शन घेत होते. यावेळी देवस्थान अध्यक्ष बबनराव शिंदे, सचिव बाबासाहेब शिंदे, पोलीस पाटील संघटना अध्यक्ष बाळासाहेब शिंदे, सरपंच बबनराव शिंदे, माजी सरपंच अमर शिंदे यांच्यासह ग्रामस्थ व भाविक उपस्थित होते.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.