पेठ – सातगाव पठार (ता. आंबेगाव) भागातील माध्यमिक व प्राथमिक शाळांमध्ये शालेय पोषण आहार शिल्लक धान्यादी माल न्यायालयाच्या आदेशाने वितरित करण्यात आला.
लॉकडाऊनच्या कालावधीत सर्व व्यवहार व शाळाही बंद असल्याने त्या कालावधीतील शिल्लक शालेय पोषण आहार इयत्ता पाचवी ते आठवीच्या पालक व विद्यार्थी यांना मिळावा यासाठी जनहित याचिका सुप्रिम कोर्टात दाखल केली होती. त्या जनहित याचिकेचा निकाल लागल्याने त्यानुसार शासनाने परिपत्रक काढून धान्यादी मालाचे वितरण सुरू झाले. शिल्लक धान्यादी माल नेण्यासाठी करोनाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून सुरक्षित अंतर ठेवून तोंडाला मास्क, रुमाल बांधून धान्य नेले. पेठ येथील श्री वाकेश्वर विद्यालयात इयत्ता 5वीच्या 115 व इयत्ता 6वी ते 8वीच्या 342 मुलांना गेले दोन दिवसांपासून शालेय व्यवस्थापन समिती व शाळा समिती पदाधिकारी यांच्या उपस्थित शिल्लक धान्यादी माल मुलांना वाटप करण्यात येत आहे. शाळा समिती अध्यक्ष अजय कंधारे, संस्थेचे उपाध्यक्ष संतोष धुमाळ, सचिव मयूर काळे उपस्थित होते.