पुणे जि.प.सदस्यांनी काढली अधिकाऱ्यांची खरडपट्टी

आरोग्य, बांधकाम विभागाच्या कारभारावर दर्शविली नाराजी

पुणे – तालुक्‍यांचे वैद्यकीय अधिकारी जागेवर नसतात तर आरोग्य केंद्रात डॉक्‍टरांचा ठावठिकाणा नाही. प्राथमिक आरोग्य केंद्र आणि उपकेंद्र बांधकामाला मंजुरी मिळून दोन वर्षे झाली अद्याप कामाला सुरुवात नाही, अशा विविध तक्रारी करीत जनतेला आरोग्याच्या सुविधा मिळणार कधी असा संतप्त सवाल जिल्हा परिषदेच्या सदस्यांनी सर्वसाधारण सभेत केला. यावेळी आरोग्यासह बांधकाम विभागाच्या अनागोंदी कारभाबाबत अधिकाऱ्यांची सदस्यांनी खरडपट्टी काढली.

जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत ऐन वेळच्या विषयांवर चर्चा करण्यात आली. त्यावेळी या मुद्यांवर चर्चा घडून आली. यावेळी जिल्ह्यातील आरोग्य प्रश्‍नावर भाजपचे गटनेते शरद बुट्टे पाटील, सदस्य विठ्ठल आवाळे, रणजित शिवतारे, कुसुम मांढरे, निर्मला पानसरे यासह अन्य सदस्यांनी एकावर एक प्रश्‍नांचा भडिमार करत अधिकाऱ्यांची बोलती बंद केली. “भोर तालुक्‍यातील नेर गावात रुग्णवाहिका दोन महिन्यांपासून उपलब्ध नाही. डॉक्‍टर जागेवर नसतात. रुग्ण दगावण्याची भीती अधिक आहे. याची काळजी घेणार कोण असा सवाल करून रुग्ण दगावल्यावर आरोग्य विभाग जागे होणार का,’ असा संतप्त सवाल जिल्हा परिषदेचे सदस्य विठ्ठळ आवाळे यांनी उपस्थित केला. त्यांच्या या प्रश्नानंतर रणजित शिवतारे यांनी भोर तालुका हा दुर्गम भाग आहे. तेथे आरोग्य सुविधा मिळाल्या पाहिजे. रुग्णवाहिका वेळेवर पोहोचत नसल्याची तक्रार केली.

आरोग्य विभागाच्या सुविधा वेळेवर मिळत नाही. एकीकडे राज्यात आरोग्य विभाग चांगली कामगिरी करीत असल्याचे प्रशस्तिपत्रक मिळविते आणि दुसरीकडे जिल्ह्यात अशी स्थिती याबाबत आरोग्य विभागाला गांभीर्य नाही, असा आरोप शरद बुट्टे पाटील यांनी केला. आरोग्य विभागातून उत्पन्नाचे स्रोत कमी होत चालले आहे. तसेच डॉक्‍टर उपलब्ध होत नसल्याची तक्रार त्यांनी सर्वसाधारण सभेत केली. “दोन वर्षांपासून आरोग्य केंद्रासह उपकेंद्रासाठी जागा उपलब्ध आहे. पण अद्याप बांधकाम पूर्ण झाले नाही,’ अशी तक्रार सदस्य निर्मला पानसरे यांनी केली. तर कुसुम मांढरे म्हणाल्या, ‘कोरेगाव भीमा येथे आरोग्य केंद्र आणि कासार येथे उपकेंद्र सुरु कऱण्यास मान्यता देण्यात आली आहे. परंतु, अद्याप बांधकाम करण्यात आले नाही. त्यावर आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप माने यांनी उपस्थित सदस्यांच्या तक्रारीची दखल घेत डॉक्‍टरांची उपलब्ध करण्याचे आश्वासन दिले. काही ठिकाणी आरोग्य केद्रांना जागा उपलब्ध नसल्याने त्या ठिकाणी मान्यता असूनही बांधकाम करण्यात आले नाही. यावर्षी जागा उपलब्ध करून बांधकाम केले जाईल, अशी ग्वाही दिली.

अध्यक्षांनी दिली तंबी
जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विश्वास देवकाते यांनी या वर्षात आरोग्य केंद्रासाठीचा निधी वापरण्यात यावा. तो अखर्चित निधी राहता कामा नये, अशा शब्दांत तंबी अधिकाऱ्यांना दिली.

Leave A Reply

Your email address will not be published.