पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थ होणार आक्रमक

जानाई-शिरसाई उपसा सिंचन योजनेतून पाणी सोडण्याची शेतकऱ्यांची मागणी.

वासुंदे – दौंड आणि बारामती बारामती तालुक्‍यातील जिरायती भागाला वरदान म्हणून लाभलेल्या जानाई-शिरसाई उपसा सिंचन योजनेतून तलावात पिण्यासाठी पाणी सोडण्याबाबत वासुंदे, हिंगणीगाडा, रोटी, नारोळी,उंडवडी, तसेच सुपे आदी परिसरातील शेतकऱ्यांनी मागणी केली आहे. ही मागणी दिवसेंदिवस जोर धरू लागली आहे. दुष्काळी परिस्थिती पाहता फक्त जनावरांना आणि माणसांना पिण्यासाठीच शिरसाई योजनेसाठी 150 एमसेफटी आणि जानाई योजनेसाठी 200 एमसेफटी एवढेच पाणी मिळावे, अशी माफक अपेक्षा पशुधारक व ग्रामस्थ करत आहेत; परंतु जिरायती पट्ट्यातील शेतकऱ्यांना पाणी सोडण्याबाबत राजकीय मंडळी तथा अधिकारी निरुत्साही असल्यामुळे शेतकरी वर्गाने नाराजी व्यक्त केली आहे. सध्या लोकसभा निवडणुका असल्याने राजकीय मंडळी तथा अधिकारी निवडणुकीत मग्न असल्याचे सांगितले जाते.

गोरगरीब जनता उपशी मरो, अथवा पाण्यासाठी वणवण भटको, याचे कोणालाही काही फरक पडत नसल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. ऐन दुष्काळात शासनाने जिरायती भागातील लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी जानाई शिरसाई उपसा सिंचन योजनेतून तलावात पाणी सोडावे, असे मत शेतकऱ्यांकडून व्यक्त केले जात आहे.

  • शासनाने शेतकऱ्यांना दुष्काळू मदत तात्काळ देणे गरजेचे आहे, तसेच जनावरासाठी चारा छावणी किंवा चारा डेपो सुरू करण्याची गरजच आहे.
    – शंकर जांबले, ग्रामपंचायत सदस्य, वासुंदे

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.