- पोलिसांचे अपयश : चोरीला गेलेल्या ७० टक्के वाहनांचा ‘पत्ता’च नाही
– संदीप घिसे
पिंपरी – पुणे आणि पिंपरी चिंचवड शहर दुचाकीचे शहर म्हणून ओळखले जाते. गेल्या काही महिन्यांमध्ये वाहन चोरीचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. मात्र वाहन शोधण्याचे प्रमाण अवघे 30 टक्केच आहे. यामुळे चोरीस गेलेली 70 टक्के वाहने जातात तरी कुठे, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे. गेल्या दोन वर्षांची आकडेवारी शहरात सरासरी रोज तीन ते चार वाहने चोरली जात आहेत.
शहराचा मोठ्या प्रमाणात विस्तार झाला आहे. जणू काही शहराच्या लोकसंख्येसोबत प्रतिस्पर्धा करत असल्याप्रमाणे वाहनांची संख्या वाढत आहे. वाहन पार्क करण्याची व्यवस्था नसताना देखील हौसेने वाहने खरेदी केली जातात. परिणामी शहरातील बहुतेक नागरिकांची वाहने ही सार्वजनिक रस्त्यावरच पार्क केलेली असतात. रोज रात्री शहरातील आणि उपनगरातील बहुसंख्य रस्त्यांच्या दोन्ही बाजूला पार्क केलेल्या वाहनांच्या लांबच-लांब रांगा लागलेल्या दिसतात. पर्यायाने वाहनचोरांसाठी हे शहर एक मोकळे रान आहे.
मुख्य शहरात आणि उपनगरांमध्ये नागरिकांनी जमिनी घेऊन दोन ते तीन मजिली इमारती उभ्या केल्या आहेत. खाली पार्किंगला जागा ठेवण्याऐवजी खोल्या आणि दुकाने काढून भाड्याच्या स्वरुपात उत्पन्न मिळविले जाते. यामुळे घरमालक आणि त्या इमारतीत राहणाऱ्या सर्वच भाडेकरुंची वाहने ही घरासमोर, आसपासच्या रस्त्यांवरच पार्क होतात. पार्किंगच्या वादातून वाद-विवाद रोजचेच झाले आहेत. परंतु त्यापेक्षाही मोठी समस्याही वाहनचोरीची झाली आहे.
अवघ्या पाच मिनिटांमध्ये होते वाहन चोरी
दुचाकीचा हॅंडल लॉक तोडला जातो. त्यानंतर हॅंडल जवळील वायर तोडून दुसऱ्या तोडलेल्या वायरला ती जोडल्यावर दुचाकी सुरू होते. अनेकदा ऑन-ऑफचा स्वीच खराब झाल्याने कालांतराने इतर कोणत्याही चावीने वाहन सुरू होते. वाहन चोरी करण्यासाठी चोरट्याला अवघा तीन ते पाच मिनिटांचा कालावधी लागतो.
चोरीची वाहने जातात तरी कुठे?
वाहन चोरीच्या मागे एखादी आंतरराज्यीय टोळी असल्याची शक्यता पोलीस वर्तवित असतात. एकाने वाहन चोरी करायचे, दुसऱ्याने ते इतर ठिकाणी सोडायचे, अशा गुन्ह्यांमध्ये एका चोरट्याला साखळीतील दुसऱ्या चोरट्याबाबत काहीच माहिती नसते. पोलिसांनी चोरट्याला अटक केली तरी टोळीचा प्रमुख कधीच पोलिसांच्या हाती लागत नाही.
अल्पवयीन चोरटे पोलिसांची डोकेदुखी
पोलिसांनी आत्तापर्यंत उघडकीस आणलेल्या गुन्ह्यांमध्ये अल्पवयीन मुलांचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे. ही मुले पोलिसांच्या रेकॉर्डवर नसल्याने त्यांना शोधून काढण्याचे मोठे आवाहन पोलिसांसमोर असते.
‘जॉय रायडिंग’साठी चोरी
अनेकदा महाविद्यालयीन मुले मौजमजेसाठी (जॉय रायडींग) वाहन चोरी करीत असल्याचे दिसून आले आहे. वाहन चोरल्यानंतर जोपर्यंत वाहनात पेट्रोल आहे तोपर्यंत वापरायचे आणि पेट्रोल संपल्यावर ते त्याच ठिकाणी वाहन सोडून द्यायचे, अशी गुन्हा करण्याची पद्धत आहे.
वाहन चोरांची ठिकाणे
मोठमोठी रुग्णालये, उड्डाण पुलाखालील जागा, मॉल बाहेरील पार्किंग, उद्यानाबाहेरील पार्किग आणि रात्रीच्यावेळी घराजवळ आणि रस्त्यावर उभी केलेली वाहने ही चोरांची प्रमुख ठिकाणे आहेत.
वाहन चोरांची अशीही ‘आयडिया’
अपघातातील भंगार वाहने विमा कंपन्यांकडून विकत घ्यायचे. विकत घेतलेल्या वाहनाचा चेसी व इंजिन नंबर कापून तो चोरलेल्या वाहनाला लावायचा आणि भंगारातील वाहनाचा क्रमांक चोरलेल्या गाडीला लावून ती विकायची, असा प्रकार सांगलीमध्ये उघडकीस आला होता, असे काही प्रकार शहरात तर घडत नाहीत ना, अशी भीती व्यक्त केली जात आहे. याव्यतिरिक्त अनेक ठिकाणी चोरटे चोरलेल्या वाहनाचे सुटे भाग करून त्याची विक्री करतात. यामुळे चोरीचे वाहन पोलिसांना शोधूनही सापडत नाही.
वाहनाची अशी घ्या काळजी
- सीसीटीव्ही कॅमेरे, सुरक्षा रक्षक आहेत अशाच ठिकाणी वाहने पार्क करा
- दुचाकीला केवळ हॅन्डल लॉकबराेबरच आणखी एखादे कुलूप लावा
- वाहनाच्या चावीचा स्वीच दर तीन वर्षांनी बदला
- वाहनांच्या सुरक्षिततेसाठी जीपीएस किंवा ऍन्टी थेफ्ट डिव्हाइस बसवा