महाअधिवेशनात राज ठाकरे मोठ्या घोषणा करण्याची शक्यता
मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत नवीन बदल होण्याची चर्चा सुरू असतानाच आता मनसेच्या अधिकृत फेसबुक पेजवरुन पक्षाचा जुना झेंडा गायब झाला आहे. चार रंगाच्या झेंड्यावर रेल्वे इंजिनचे चिन्ह होते. मात्र आता फक्त रेल्वे इंजिनच ठेवण्यात आले आहे. त्यामुळे मनसेच्या झेंडा बदलाच्या चर्चेने आणखीनच वेग पकडला आहे.
मनसेला आलेली मरगळ झटकण्यासाठी आणि पक्ष संघटन पुन्हा एकदा मजबूत करण्यासाठी राज ठाकरे यांनी पक्षाचे महाअधिवेशन बोलावले आहे. या अधिवेशनात राज ठाकरे अनेक मोठ्या घोषणा करण्याची शक्यता आहे. याच अधिवेशनात मनसेच्या नव्या झेंड्याचे लॉन्चिंग होण्याची शक्यता आहे. त्यामुळे झेंडा बदलत मनसे कात टाकणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
मनसेचा चौरंगी झेंडा आता बदलणार आहे. आत्तापर्यंत मनसेच्या अजेंड्यावर मराठीच्या मुद्या अग्रभागी होता. आता त्याचसोबतच मनसे हिंदुत्वाचा मुद्दाही आक्रमकपणे लावू धरणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
येत्या 23 जानेवारीला मनसेचे महाअधिवेशन मुंबईत होत असून त्यात राज ठाकरे पक्षाचे नवीन धोरण जाहीर करणार आहेत.मनसेच्या राजकीय वाटचालीत हा निर्णय सर्वात महत्त्वाचा ठरणार असून मनसेला हा बदल यश मिळवून देणार का याकडे सगळ्यांचे लक्ष असणार आहे.
राज ठाकरे खेळणार नवा डाव
राज्यात बदलती राजकीय परिस्थिती लक्षात घेऊन मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे नवी खेळी खेळण्याच्या तयारीत आहे. शिवसेनेने भाजपशी काडीमोड घेऊन कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत जात सत्ता मिळविली आहे.
कॉंग्रेससोबत गेल्याने शिवसेनाला आपली कडवी भूमिका थोडी मवाळ करावी लागली होती. त्यामुळे शिवसेनेचा कट्टर हिंदुत्ववादी मतदार आपल्याकडे खेचण्यासाठी मनसे नवी भूमिका स्वीकारणार असल्याची चर्चा आहे.