पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी साहेबराव गायकवाड यांची प्रतिनियुक्तीवर बदली करण्यात आली आहे. त्यामुळे पिंपरी चिंचवड महापालिकेत आता तीन अतिरिक्त आयुक्त काम करणार आहेत. महापालिकेतील पदोन्नतीने नियुक्त करावयाच्या अतिरिक्त आयुक्तांचे पद रिक्त होते. त्या पदावर गायकवाड यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
पुणे जिल्हाधिकारी कार्यालयातील अप्पर जिल्हाधिकारीपदावरुन गायकवाड यांची महापालिकेत अतिरिक्त आयुक्त म्हणून बदली झाली आहे. “ब’ वर्गात समावेश झाल्यामुळे महापालिकेचा नवा आकृतीबंध, सेवा प्रवेश व सेवांचे वर्गीकरण नियम नव्याने तयार केले होते. महापालिकेच्या आकृतीबंधाला राज्य सरकारने मंजुरी दिली आहे. नवीन आकृतीबंधानुसार महापालिकेत तीन अतिरिक्त आयुक्तांची पदे आहेत. त्यातील दोन आयुक्त राज्य शासनाकडील प्रतिनियुक्तीवरचे आहेत. तर एका अतिरिक्त आयुक्त पद हे महापालिकेतील अधिकाऱ्यांमधून पदोन्नतीने भरावयाचे होते. यापूर्वी संतोष पाटील व अजित पवार हे दोन अतिरिक्त आयुक्त प्रतिनियुक्त केलेले आहेत.
त्यामुळे आता तिसरे अतिरिक्त आयुक्त पद हे महापालिकेतील अधिकाऱ्यांना मिळेल अशी अपेक्षा होती. मात्र महापालिकेतील तिसऱ्या रिक्त अतिरिक्त आयुक्त या पदावर गायकवाड यांची बदली करण्यात आली आहे. राज्यातील करोना संसर्ग रोखण्यासाठी तातडीची निकड आणि अपवादात्मक परिस्थिती लक्षात घेऊन त्यांची बदली केल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे. राज्य सरकारचे उपसचिव डॉ. माधव गीर यांनी याबाबतचा आदेश काढला आहे.
अधिकाऱ्यांमध्ये नाराजीचा सूर
पिंपरी-चिंचवड महापालिकेतील तीन अतिरिक्त आयुक्तांच्या पदापैकी दोन शासन नियुक्त पदावरील दोन्ही अधिकारी कार्यरत आहेत. तिसरे पद हे पदोन्नतीने भरावयाचे असल्यामुळे महापालिकेतील कार्यरत अधिकाऱ्यांपैकी निकषामध्ये बसणाऱ्या व्यक्तीला यावर नियुक्त करण्यासंदर्भातील विषय प्रलंबित होता. या पदावर काहीजणांनी दावा करत आयुक्तांकडे नियुक्तीबाबत मागणी केली होती. मात्र निर्णय झालेला नव्हता. या पदावर आता शासननियुक्त अधिकाऱ्याची नियुक्ती केल्यामुळे स्थानिक अधिकाऱ्यांमध्ये नाराजी पसरली आहे.