जलसंपदा मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांची माहिती
इस्लामपूर (प्रतिनिधी) – टाटा ट्रस्टच्या सहकार्याने आठ कोटी रुपये खर्चून येथील उपजिल्हा रुग्णालयात विशेष कक्ष सुरू करणार असल्याची माहिती जलसंपदा मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. याबरोबर असेच रुग्णालय बुलढाणा येथेही सुरू करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
मंत्री जयंत पाटील म्हणाले, ‘आरोग्य मंत्री राजेश टोपे आणि टाटा ट्रस्ट यांच्या सहकार्याने उपजिल्हा रुग्णालयात एक विशेष कक्ष सुरू होत आहे. अत्याधुनिक स्वरूपाचा आयसीयू कक्ष, सात ते आठ बेड्स आणि व्हेंटिलेटर अशी व्यवस्था करण्यात येणार आहे. अत्याधुनिक सेवा उपलब्ध होणार असल्याने साथीच्या रोगावर मात करणे शक्य होईल.’
ते म्हणाले, ‘करोना विषाणू संसर्गामुळे सर्वसामान्य, गरीब लोकांच्यावर दोन वेळचे अन्न मिळण्याचीही अडचण झाली होती. राष्ट्रवादीच्या पुढाकाराने इस्लामपुरात माणुसकीची थाळी हा उपक्रम सुरू केला. त्या माध्यमातून दहा केंद्र सुरू केली आहेत. यातून आत्तापर्यंत ५५ हजार ६५० जेवण थाळीचे वाटप केले आहे. दिवसाला सरासरी ३८२५ ते ३८९० लोक या थाळीचा लाभ घेतात. युवा नेते राजवर्धन पाटील आणि राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष शहाजी पाटील हे दोघे हा उपक्रम यशस्वी पणे चालवत आहेत.
ते म्हणाले, ‘सांगली जिल्ह्यात बाहेरून आलेल्या रुग्णांमुळे खऱ्या अर्थाने करोनाबाधित रुग्णांची संख्या वाढली. आता जे बाहेरून येतील त्यांना १४ दिवस सक्तीने क्वारंटाईन केले जात आहे. आपला जिल्हा ऑरेंज झोनमध्ये आला असून टप्प्याटप्प्याने शासनाच्या नियमानुसार जिल्हाधिकारी अंमलबजावणी करतील.
आपल्या जिल्ह्यातील आणि राज्यातील बरेच लोक परराज्यात विविध ठिकाणी अडकले आहेत. वरिष्ठ सचिव नितीन करीर त्यांना परत आणन्याच्या व्यवस्थेचे समन्वयक आहेत. त्यांच्या माध्यमातून त्या त्या भागात अडकलेल्या लोकांशी समन्वय साधून त्यांची व्यवस्था केली जात आहे. कोटा येथे २५०० विद्यार्थी अडकले होते, जालंधर येथील लवली विद्यापीठातील विद्यार्थ्यांचा प्रश्न होता तोही मार्गी लावला आहे. देशभरात अडकलेल्या विटा येथील गलाई बांधवांचा प्रश्नही सोडवला जाईल.’
सलग पन्नास दिवस लॉकडाऊन केल्यामुळे कोरोनाची साखळी तुटेल, असा निष्कर्ष आहे त्यामुळेच लॉकडाऊन पुन्हा वाढवला असावा. महाराष्ट्रात होणाऱ्या चाचण्यांचे प्रमाण जास्त असल्याने रुग्णसंख्या जास्त आसल्याचे जयंत पाटील यांनी सांगितले.