निवडणूक आली तरी रस्ता नाही

मुळशी तालुक्‍यातील दारवलीकरांची व्यथा ः ग्रामस्थ मेटाकुटीला

हिंजवडी- दारवली (ता. मुळशी) येथील रस्त्याची दुर्दशा गेल्या अनेक वर्षांपासून काही सुटता सुटेना. याबाबत नेमकं काय गौडबंगाल आहे, हे संबंधित अधिकारी आणि विद्यमान आमदार संग्राम थोपटे यांनाच माहित. कारण अनेक वर्षांपासून दुर्लक्षित केलेल्या या रस्त्यासाठी बऱ्याच महिन्यांपूर्वी निधी उपलब्ध होऊन कसेबसे आचार संहिता लागू होण्यापूर्वी आमदारांच्या हस्ते भूमिपूजन झाले होते; मात्र तरीही या रस्त्याचा प्रश्‍न आजतागायत “जैसे थे’च असल्याने दारवलीकर ग्रामस्थ मात्र मेटाकुटीला आले आहेत.

लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू असताना, एकीकडे मतांचा जोगवा मागताना राजकीय पदाधिकारी दिसत आहेत. याउलट सामान्य नागरिक मात्र मुलभूत सुविधेच्या उपलब्धीपासून वंचितच राहिला आहे. रस्ता नाही म्हणून वैतागलेल्या मुळशी तालुक्‍यातील रावडे, संभवे, हुलावळेवाडी, खुबवली, असदे, शिळेश्‍वर, गावडेवाडी आणि भादस या गावांनी मतदानावर बहिष्कार टाकल्याचं निवेदन निवडणूक अधिकाऱ्यांना दिले. त्यानंतर जागे झालेल्या यंत्रणेने या रस्त्याचे काम हाती घेतले खरे, पण ते दाखवण्यापुरते की केवळ समजूत काढण्यापुरते आहे हे येणारा काळच ठरवेल. गेल्या अनेक वर्षांपासून दुर्दशेच्या गर्तेत असलेल्या दारवली येथील रस्त्याला अच्छे दिन कधीच बहाल करून न देणाऱ्या किंवा तसा मनापासून प्रयत्न न करणाऱ्या लोकप्रतिनिधींना एक चपराक देण्याचा प्रयत्न या भागातील ग्रामस्थांनी नक्कीच करावा आणि भोंगळ, ढिसाळ कारभार करणाऱ्या प्रशासनाला वठणीवर आणण्यासाठी पाऊले उचलावीत, हीच काळाची गरज आहे.

याबाबत स्थानिक पत्रकारांनी बराच वेळा संबंधित अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा केला. तर वेळोवेळी कारणांचा नवनवीन मार्ग सांगितला गेला. ठेका निघाला आहे, लवकरच भरला जाईल. ठेका अजून भरलाच गेला नाहीए. वेळ निघून गेल्याने आता ठेका पुन्हा निघेल. ठेका पुन्हा निघाला आहे व तो भरला आहे, लवकरच काम सुरू होईल. काम सुरू न झाल्याने जानेवारी महिन्यात पुन्हा पाठपुरावा केला तर दारवली ग्रामपंचायत निवडणूक आहे, काम त्यानंतर चालू होईल. निवडणूक संपली त्यानंतरही काम सुरू झाले नाही, यावर अधिकाऱ्यांना पुन्हा पत्रकारांनी विचारले असता मार्च संपायच्या आत रस्ता झाला असेल, असे सार्वजनिक बांधकामचे शाखा अभियंता शिंदे यांनी ढळढळीत छातीठोक आश्‍वासन दिले होते.

आता एप्रिल सुरू होऊनही रस्ता न झाल्याने शिंदे यांना विचारले असता ते म्हटले की, आचार संहितेच्यामुळे ठेका अडकला आहे. आचार संहिता संपली की काम सुरू होईल. अशा वेळकाढू अधिकाऱ्यांना नक्की कोण पाठिशी घालत आहे? लोकप्रतिनिधी म्हणून विद्यमान आमदार व खासदार हे लोकांना काय सांगत असावेत? आमदार व खासदारांचे पक्ष पदाधिकारी आता या लोकांकडे काय म्हणून मत मागणार आहेत, हे देवच जाणे! जिल्ह्याचे पालकमंत्री यांना मुळशीकरांच्या समस्येबद्दल माहिती आहे का? खड्डे दाखवा म्हणणारे सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील त्यांच्या पक्षाचा या मतदार संघाचा उमेदवार विजयी मतांनी निवडून येणार, असे दृढ निश्‍चयाने म्हणतात, त्यांना इथल्या रस्त्यांची दुर्दशा माहित आहे काय? यासारखे प्रश्‍नांची उत्तर तेव्हाच मिळतील जेव्हा निवडणूक बहिष्काराचं हत्यार उपसलं जाईल. नाहीतर लोकशाहीचा उत्सव साजरा होईल आणि इथले ग्रामस्थं मात्र वाट बघत बसतील.

  • मार्चनंतर रस्त्याची कामे दर्जेदार होणार का?
    गेले अनेक महिने मंजूर असलेले दारवली रस्त्याचे काम आचार संहिता संपल्यानंतर सुरू झालेच तर ऐन पावसाळ्यातल्या वाटेवर हे काम दर्जेदार होणार का? हा प्रश्‍न आहे. मार्चनंतर कधीही अचानक पाऊस पडतो, त्यामुळे डांबर हे तग धरू शकत नाही. त्यामुळे पाऊस नेमका पडावा अशी या शासकीय अधिकाऱ्यांना मनिषा आहे का? त्यामुळे दर्जेदार काम करायचेच नाही, ही मानसिकता असलेल्या अधिकाऱ्यांना वा प्रशासनाला रस्ता व्यवस्थित न करता दर दोन वर्षांनी निधी पडावा आणि ठेक्‍यांचे काम चालत रहावे, असे तरी आता दिसत आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.