दौंडमध्ये पाणंद रस्ता योजना पुन्हा राबवा

दौंड- जिल्हात पाणंद रस्ता उपक्रमास शेतकऱ्यांकडून मोठा प्रतिसाद मिळला होता. याद्वारे शेतीतील रस्त्यांचे वाद संपुष्टात येत असून प्रत्येक शेतीला रस्ता उपलब्ध झाल्याने शेतमालाची वाहतुकही सोपी झाल्याने या योजनेला प्रचंड प्रतिसाद मिळाला होता. दौंड तालुक्‍यातही ही योजना नव्याने जोमात राबविण्यात यावी, तालुक्‍यातील रस्त्यांचे उरले सुरले वादही याद्वारे निकाली काढावेत, अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.

राज्यात पाणंद रस्त्यासंदर्भातील योजनेची अंमलबजावणी दि. 1 मे 2011 पासून करण्यात येत आहे. “सुवर्ण जयंती राजस्व अभियान’ या योजनेअंतर्गत हा उपक्रम सुरु करण्यात आला होते. अवघ्या एका वर्षात जिल्ह्यातील बहुतांशी शेतकऱ्यांचे रस्त्यांचे बहुतांशी वाद मिटवीण्यात याद्वारे यश आले होते. तर, काही वाद मिटवण्याच्या प्रक्रिया सुरू आहेत.
पुणे जिल्ह्यातही तत्कालीन जिल्हाधिकारी विकास देशमुख यांच्या माध्यमातून ही योजना राबविण्यात आली होती. पहिल्या पाणंद रस्त्याचे उद्‌घाटन दि. 1 मे 2011ला ओतूर येथे जुन्नर विभागाचे तत्कालीन उपविभागीय अधिकारी सुनील थोरवे यांच्या हस्ते झाले होते. त्यानंतर सदर योजना राबविण्याकरिता जिल्हाधिकाऱ्यांनी तालुक्‍याच्या तहसिलदारांना आदेश दिले होते.

यानुसार दौंडमध्येही तत्कालीन तहसीलदारांनी ही योजना यशस्वीपणे राबविली. सदर योजना राबविताना पाणंद रस्त्याकरिता अनेक शेतकऱ्यांनी पीके काढून घेतली आणि शेतीच्या आखणी-मांडणीत बदल घडण्यास सुरवात झाली. प्रत्येक शेतकरी रस्त्यालगतच (फ्रंटला) येईल, अशी स्थिती नसते. परंतु, प्रत्येकाला शेतात जाण्याकरिता रस्ता मिळायलाच हवा, तो प्रत्येक शेतकऱ्याचा कायदेशीर हक्क आहे. ज्या शेतकऱ्यांना शेतात जाण्याकरिता दुसऱ्या शेतकऱ्याच्या बांधावरून जावे लागते, त्यामुळे पाणंद योजना महत्त्वाची ठरत आहे.

यासंदर्भात अधिकारी, जिल्हा परिषद सदस्य, सरपंच व तलाठी यांनीही याबाबत ग्रामस्थांत जनजागृती केली आहे. आता, पाणंद रस्त्यांबाबत शेतकरी स्वत:हून पुढे येऊन प्रशासनाला सहकार्य करण्यास तयार आहेत. याच कारणास्तव तालुक्‍यात जे काही रस्त्याचे वाद आहेत, हे याद्वारे निपटून काढावेत, अशी मागणी अनेक शेतकऱ्यांकडून केली गेली आहे.

  • पाणंद रस्त्यांबाबत शेतकऱ्यांकडून प्रतिसाद मिळाल्यास ही योजना यशस्वीपणे राबविता येणे शक्‍य आहे. याकरिता गावपातळीवर सरपंच, उपसरपंच, पं.स. सदस्य, जि.प.सदस्य यांचेही सहकार्य या कामी महत्त्वाचे ठरत असते, असे अर्ज आल्यास योग्य ती कार्यवाही करून प्रश्‍न सोडविता येतील.
    बालाजी सोमवंशी, तसहसीलदार, दौंड

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.