टेभूच्या पाण्याची खटाव तालुक्‍यात ठिणगी

कलेढोण परिसरातून लढ्‌याला सुरूवात; मतदानावर बहिष्कारचा निर्धार

सातारा/कलेढोण, दि. 5 (प्रतिनिधी) –

खटाव तालुक्‍यातील कलेढोणसह पाचवड, विखळे, मुळीकवाडी, गारळेवाडी, गारुडी, तरसवडी, हिवरवाडी, औतडवाडी, पडळ, आगासावडी, ढोकळवाडी ही कायम दुष्काळी असणारी गावे शेतीच्या पाण्यासाठी येत्या 10 जूनला लढा उभा करणार आहेत. दि. 10 रोजी विखळे (ता. खटाव) येथे होणाऱ्या बैठकीत आंदोलनाची दिशा ठरणार असून या बैठकीला सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी तसेच सर्व गावातील नागरिक सरकारच्या विरोधातील लढ्याची दिशा ठरवणार आहेत.

खटाव तालुक्‍यातील कलेढोण परिसरातील सोळा गावे सातत्याने आंदोलन करून देखील कोणत्याही शासकीय सिंचन योजनेचा लाभ न भेटल्याने आजही वंचित आहेत. परिणामी ही सोळा गावे प्रचंड दुष्काळाच्या खाईत लोटली गेली आहेत. कलेढोण परिसरात पाण्याअभावी तडफडणाऱ्या जनावरांसाठी चारा छावणीदेखील उभी केली नसल्याने जनावरांच्या चाऱ्याचा तसेच पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाल्याने गावकऱ्यांवर गाव सोडण्याची वेळ आली आहे.

पश्‍चिम महाराष्ट्रात प्रामुख्याने जिहे-कठापूूर, उरमोडी, तारळी तसेच टेंभू या सिंचन योजना सक्रिय असून देखील सोळापैकी कोणत्याच गावाचा यांच्या लाभक्षेत्रात समावेश सरकारने केला नाही. या भागातल्या जनतेने आतापर्यंत पिण्याच्या व शेतीच्या पाण्यासाठी अनेक आंदोलने केली.

मात्र, सर्व आंदोलनं राजकीय दबावाखाली निष्क्रिय ठरल्याने जनतेत टेंभूच्या पाण्याच्या बाबतीत सरकारी भुमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. मात्र, पुन्हा एकदा दुष्काळी परिस्थितीसमोर जनतेने हात टेकल्याने पुन्हा एकदा सोळा गावातील जनतेने आंदोलन उभे करण्याचा निर्णय घेतला आहे.

कलेढोणसह सोळा गावांना पाणी देण्याची आश्वासने जनतेला यापुर्वी अनेकदा दिली गेली. अगदी ग्रामपंचायत, विधानसभा ते लोकसभेच्या प्रत्येक निवडणूकीत फक्त कागद नाचवून मत गोळा केली गेली. मात्र, प्रत्यक्षात कोणतीही कार्यवाही न केल्याने जनतेची फसवणूक थांबावी म्हणून कलेढोण परिसरातील सोळा गावांनी बहिष्काराचे अस्त्र उगारले आहे.
——————————————————————
आंदोलन हाच एकमेव पर्याय
सर्वात मोठ्या टेंभूचे पाणी कलेढोणच्या परिसतील भिकवडी देवीखिंडी पिंपरी या सांगली जिल्ह्यातील गावांना दिले. मात्र, कलेढोण भाग कायम पाण्यापासून वंचित ठेऊन इथल्या जनतेच्या भावनांशी खेळण्याचा प्रकार घडला आहे. पाणी उशाला आणि कोरड घशाला अशी अवस्था या भागाची झाल्याने आंदोलन हाच एकमेव पर्याय आहे.
सोमनाथ शेट्ये, सरचिटणीस खटाव तालुका भाजप
——————————————————-
आदेश असेल तरच नेत्यांनी यावे
आंदोलनावेळी कोणात्याही राजकीय पक्षाच्या नेते मंडळीनी वरवरचे प्रेम दाखवण्यासाठी उपस्थित राहण्याची आवश्‍यकता नाही. ज्यांना कुणाला खरच या भागातील जनतेचा कळवळा आहे त्यांनी पाणीप्रश्‍नावर तोडगा निघाल्याचा सरकारी आदेश घेऊनच आंदोलन स्थळाला भेट द्यावी.
 शैलेश वाघमारे, कान्हरवाडी

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.