खडकवासलाचे आवर्तन बंद करू नका

आमदार राहुल कुल यांची पाटबंधारेला सूचना

दौंड- दौंड तालुक्‍याला खडकवासला कालव्याद्वारे दिली जाणारी आवर्तन सुरु असल्याने शेतकऱ्यांतून समाधान व्यक्त होत आहे. परंतु, पुण्यातून पिण्याच्या पाण्याची मागणी वाढू लागल्याने ही आवर्तने बुधवार (दि.8) पासून बंद होणार आहेत. मात्र, शेतीचा विचार करता ही आवर्तने या महिन्यांत मिळणे गरजेचे असल्याने ती बंद करू नयेत. सध्या, तीव्र उन्हाळा जाणवत आहे. तालुक्‍यातील अनेक गावात पिण्याच्या पाण्याची स्थिती गंभीर आहे. आवर्तन सुरू ठेवले नाही तर शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास जाईल. यामुळे खडकवासलातून दिले जाणारे आवर्तन बंद करू नयेत, अशी सूचना आमदार ऍड. राहुल कुल यांनी पाटबंधारे विभागाला केली आहे.

आमदार कुल म्हणाले की, दौंड तालुक्‍यातील कायमस्वरुपी दुष्काळी पट्ट्यातील खोर, देऊळगावगाडा, पडवी, कुसेगाव, हिंगणीगाडा, वासुंदे, जिरेगाव, कौठडी, रोटी, पांढरेवाडी आदी गावांच्या परिसरात पाण्याचे दुर्भिक्ष्य जाणवत आहे. येथील ग्रामस्थांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. जनावरांना हिरवा चारा नाही. शेतकऱ्यांना पशुधन जगवणे अवघड झाले आहे. ग्रामस्थांच्या पिण्याच्या पायाचा प्रश्‍न गंभीर आहे.

खडकवासलातून आजपर्यंत दिल्या गेलेल्या आवर्तनांतून तालुक्‍यातील 100 टक्के क्षेत्र ओलिताखाली येणे आवश्‍यक असताना, प्राप्त स्थितीत केवळ 30 टक्के क्षेत्र भिजले आहे. त्यामुळे कालव्याखालील अनेक गावातील पिके पाण्याअभावी धोक्‍यात आली आहेत. या महिन्यांतील आवर्तन पूर्ण होण्याआधीच ते बंद केले गेले तर हातची पीके वाया जातील. सध्याच्या पाणी टंचाईचा विचार करता तालुक्‍याला दिली जाणारी आवर्तन बंद करू नयेत, अशी मागणी करीत पुणे पाटबंधारे मंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना आमदार कुल यांनी सूचना केल्या आहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.