उन्हामुळे भामचंद्र डोंगर करपला

झाडे-झुडपे सुकली : वन्यप्राण्यांचे अन्न-पाण्याविना हाल

शिंदे वासुली  – भागवत धर्मातील समस्त वारकरी सांप्रदायाचे असिम श्रद्धास्थान म्हणून ओळखले जाणारे श्रीक्षेत्र भामचंद्र डोंगर उन्हाळ्यातील प्रखर उष्णतेमुळे अक्षरशः करपून गेला आहे. डोंगरावरील झाडे झुडपे सुकली आहेत. डोंगरावरील पाण्याचे झरे कोरडे ठणठणीत पडले आहेत. त्यामुळे डोंगरावरील जंगलात राहणाऱ्या वन्यजीवांचे अन्न व पाण्यामुळे आतोनात हाल होत आहेत.

वृक्ष वल्ली आम्हा सोयरे – वनचरे’ असे म्हणून निसर्गाशी नाते जोपासणारे, महाराष्ट्राच्या अखिल वारकरी सांप्रदायाचे कळस म्हणून प्रसिद्ध संत शिरोमणी संत तुकाराम महाराज यांची तपोभूमी म्हणजे श्रीक्षेत्र भामचंद्र डोंगर. या डोंगराला प्राचीन वारसा असून येथे अनेक मोठ्या कोरीव गुहा व गुंफा आहेत. यातील एका गुहेत प्राचीन शिवलिंग आहे असून दुसऱ्या एका गुहेत संत तुकाराम महाराज व विठ्ठल मंदिर आहे. या ठिकाणी देहू, आळंदी व महाराष्ट्रातून अनेक साधक मंडळी वारकरी सांप्रदायाचा आभ्यास करण्यासाठी वास्तव्यास असतात. डोंगराच्या सभोवताली असणाऱ्या जगलात विविध प्रकारचे पक्षी व मोर, माकडे, वानरे आदि वन्यप्राणी आढळतात. डोंगरावरील पाणी वर्षांतील 6 ते 7 महिनेच पुरेल इतकेच असते. उन्हाळ्यात याठिकाणी असणारे झरे कोरडे ठणठणीत पडतात; परंतु शिंदे, वासुली, भांबोली आदि गावातील ग्रामस्थ या ठिकाणी टॅंकरद्वारा पाण्याची सोय करतात.

यावर्षी कडाक्‍याच्या उन्हामुळे जानेवारी पासूनच पाण्याचे दुर्भिक्ष जाणवू लागले आहे. उन्हामुळे डोंगरावरील सगळी झाडे झुडपे सुकून गेली आहेत. त्यामुळे याठिकाणी वास्तव्यास असणाऱ्या वन्यजीव पाणी व खाद्यान्न मुळे तडफडण्याची वेळ आली आहे. दरम्यान, येथील साधक मंडळी ठिकठिकाणी वन्यजीवांना पिण्याच्या पाण्याची सोय करताना दिसतात. तसेच भामचंद्र नगर येथील तरकरी व्यावसायिक बंडू किसन घुले स्वत: दररोज डोंगरावर जाऊन आपल्याकडील फळे व भाजीपाला घेऊन या वन्यजीवांच्या खाण्याची काळजी घेत असल्याने त्यांचे परिसरात कौतुक होत आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.